भाजपाचा महाराष्ट्रात १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणीचा संकल्प
- सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर मध्ये प्रारंभ
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्यता नोंदणी अभियानाला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी प्रारंभ झाला. या वेळी भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पंकजाताई मुंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पक्ष सदस्यत्व दिले. या अभियानात 5 जानेवारी 2025 रोजी राज्यातील भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष सहभागी होणार आहेत.
राज्यात या अभियानात 1 कोटी 51 लाख एवढी विक्रमी प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प पक्षातर्फे करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपाच्या देशव्यापी सदस्यता अभियानाला प्रारंभ झाला. ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत्या त्या राज्यात निवडणुकीनंतर सदस्यता अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यात सदस्यता नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे.
मिस्ड कॉलद्वारे व्हा भाजपाचे सदस्य
भाजपाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी 8800002024 या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये सदस्यत्व नोंदणी क्रमांक दिला जाईल.