सहकाराची चळवळ युवकांनी पुढे न्यावी : ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : सहकारातून अर्थकारण गतिमान होत असून सहकार हा रोजगार निर्मितीचा केंद्रबिंदू आहे. सहकार हा समृद्ध जीवनाचा पाया असून युवकांनी सहकार चळवळीला पुढे घेऊन जाण्याचे आवाहन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

श्रीमान वि. स. गांगण कला, वणिज्य आणि कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी येथे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमार्फत ‘सहकारातून निर्माण होणाऱ्या रोजगार संधी’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी अॅड. पटवर्धन बोलत होते. सहकार चळवळ अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. विविध कॉलेजमध्ये या संस्थेमार्फत सहकार चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. पुस्तकी ज्ञानाची वास्तव जीवनाशी सांगड घालत सहकारी संस्थांची स्थापना, भांडवल निर्मिती, आर्थिक व्यवहार, कामकाज व सहकार क्षेत्रातील नोकरीच्या संधी याविषयी अॅड. पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
याप्रसंगी पतसंस्थेचे रिलेशनशिप मॅनेजर स्वरूप प्रभूदेसाई, संचालक प्रसाद जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक राजन कीर यांनी गुलाबपुष्प देऊन केले. उपस्थितांचे आभार प्रा. उदय गाडगीळ यांनी मानले.