भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल

मुंबई, 30 जून 2025 :भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाची विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. युवा मोर्चाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवास सुरु केलेल्या श्री. चव्हाण यांना संघटनेच्या कामाचा मोठा अनुभव असल्याने ते प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ताकदीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेचे अधिवेशन उद्या 1 जुलै रोजी वरळी येथे होणार असून या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होईल.
मंत्री अशोक उईके, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. सुनील कांबळे, आ. उमा खापरे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ आदींनी श्री. चव्हाण यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले.
केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री व या निवडणुकीसाठीचे निरीक्षक किरेन रिजिजू, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी खा. अरुण सिंह यांच्याकडे श्री. चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती हेही यावेळी उपस्थित होते.