मराठीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय!

- मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर मिळणार,
मुंबई/नवी दिल्ली : राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरु आहे. अशातच आता केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार आहे. संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.
याबाबत बोलताना डॉ. दिनेश शर्मा म्हणाले की, राजभाषा समिती देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे, हिंदी भाषेला सहयोगी भाषा म्हणून प्रस्थापित करणे यासाठी काम करत आहे. सध्या गृह मंत्रालयातील संपूर्ण कामकाज हिंदी भाषेत होत आहे, मात्र यापुढे मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देण्यात येईल. तसेच तामिळ भाषेतील पत्रांना तामिळमधूनच उत्तर दिले जाईल.’
यावेळी बोलताना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी म्हटले की, ‘तामिळनाडूमध्ये आज परिस्थिती बदलली आहे. बहुतांशी लोक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये पाठवत आहेत, तिथे हिंदी ही द्वितीय भाषा म्हणून शिकवली जाते. त्यामुळे तेथील मुले उत्तम हिंदी समजतात व बोलू शकतात’.