महिमतगडावर दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे श्रमदानातून स्वच्छता मोहीम
देवरुख : गेली तीन वर्षे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने अपरिचित व दुर्लक्षित अशा देवरुख जवळील निगुडवाडी येथील किल्ले महिमतगडावर स्वच्छता व श्रमदान मोहीम राबवून किल्ल्याचे संवर्धन व्हावे व किल्याला पर्यटकांनी भेट द्यावी, हे ध्येय उराशी बाळगून सातत्याने मोहीम, उत्सव व उपक्रम राबवून प्रयत्न सुरु ठेवले आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. २९ व ३० जानेवारी २०२३ रोजी किल्ले महिमतगडावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली. अतिशय देखणा असलेला हा किल्ला अनेक वास्तू आपल्या उदरात ठेवून आहे.
पहिल्या दिवसाच्या मोहिमेत एकूण १२ दुर्गवीरांनी सहभाग नोंदवून गडावरील दुर्लक्षित अशा धान्य कोठाराच्या उजवीकडील बाजू मधील दगड मातीचा ढिगारा काढून तो भाग मोकळा केला. पुढील मोहीमेत संपूर्ण वास्तु दगड मातीच्या ढिगाऱ्यातून मोकळी होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.
गडावर लावलेले सौर दिवे यांची पाहाणी करुन त्यांचे पॅनल स्वच्छ करण्यात आले. या मोहीमेत सहभागी झालेल्या सभासदांनी गडावरती वस्ती केली. बहुतांश सदस्य हे महाविद्यालयीन विद्यार्थी व शासकीय कर्मचारी असल्यामुळे सोमवारी सकाळी ते गड उतार झाले.
दुसऱ्या दिवसाच्या मोहीमेत अवघ्या ५ दुर्गवीर सदस्यांनी सहभाग नोंदविला संख्या कमी असली तरी चालेल पण कार्यात सातत्य ठेवायचे हाच दुर्गवीर प्रतिष्ठानचा विचार असून तीन दुर्गवीर सदस्य सोमवारी सकाळी गडावर हजर झाले. गडावरील मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर समोरील संपूर्ण भागात पावसाळ्यात झाडी झुडपे वाढली होती तो संपूर्ण भाग स्वच्छ करण्यात आला आहे . दुर्गवीरांची संख्या कमी होती पण इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळेच सोमवारची मोहीम यशस्वीपणे पार पडली.
आनंदाची गोष्ट अशी की,गडावर येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पण त्याच बरोबर गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून गडावर पत्रावळी, प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास, पार्टी झोडणारे दारुच्या बाटल्या, कोंबड्याची पिसे टाकून गडावर अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य निर्माण करुन जात आहेत. यावर वेळीच उपाययोजना केली पाहिजे असे मत दुर्गवीर प्रतिष्ठानने व्यक्त केले आहे.
या दोन दिवसीय मोहीमेत प्रशांत डिंगणकर, योगेश सावंत, अजय सावंत, राजेश सावंत, अण्णा बेर्डे,शिवम सावंत, सौरभ मांजरेकर, स्वप्निल साप्ते, प्रवीण सोष्ठे, विनय गायकवाड, यश सावंत, सागर सावंत, सोहम सावंत,संकेत सावंत,हर्षल सनगले या दुर्गवीर सदस्यांनी सहभाग नोंदविला. दुर्गवीर प्रतिष्ठान गडावरील कोणत्याही मुळ वास्तुला धक्का न लावता स्वच्छता व श्रमदान करुन वास्तु जतन करण्याचे कार्य करत असते. पुढील मोहीमेत सहभागी होण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान ९४२२०११४७७ , ८९७५३६५६७६ जवळ संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले आहे.