मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे कृषी शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी शिवाजी शिंदे (उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूण ) सरांचे मार्गदर्शन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लाभले.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती ही सरांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच स्वतःचे अनुभवही विद्यार्थ्यांसमोर मांडले आणि कशा पद्धतीने या स्पर्धात्मक युगात आपण यश संपादन करू शकतो. त्यासाठी ध्येय निश्चित करून मेहनत घ्यावी आणि त्याला मार्गदर्शनाची जोड असावी, अगदी सुलभ भाषेत सर्व विद्यार्थ्यांशी संवाद घडल्यामुळे विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा आणि सध्याच्या स्पर्धेच्या युगातले महत्त्व समजले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. मा. श्री. पांडुरंग मोहिते यांनी भूषवले. त्यांनीही विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेची जाणीव करून देऊन अभ्यासाला प्रोत्साहित केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवाजी शिंदे (उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूण) तसेच अध्यक्ष डॉ. पांडुरंग मोहिते त्याचबरोबर शत्रुघ्न म्हेत्रे (तालुका कृषी अधिकारी) तसेच विकास पिसाळ (मंडळ कृषी अधिकारी) ,जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शमिका चोरगे, उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी तसेच कृषी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते