माघी गणेशोत्सवासाठी गणपतीपुळे मंदिर परिसर सजला!
आजपासून आठवडाभर विविध कार्यक्रमांची मेजवानी
रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात दि २२ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजला आहे.
उत्सव कालावधीत मंदिरासह मंदिर परिसरात आज दिनांक 22 पासून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात देवस्थानकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दि. २२ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० श्रींची महापूजा व प्रसाद, सायंकाळी ४ ते ७ गणेशयाग देवता स्थापना, दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत गणेश याग पूर्णहुती, दि. २४ जानेवारी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सहस्त्र मोदक समर्पण, दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता श्रींची पालखी मिरवणूक ( प्रदक्षिणा ), दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसाद ( रथसप्तमी ), याचबरोबर रविवार दिनांक 22 ते गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ या कालावधीत रोज सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत डोंबिवली येथील ह.भ.प. श्री. मोहक प्रदीप रायकर यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. शुक्रवार दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता ‘स्वरार्पण’ ही शास्त्रीय, अभंग व नाट्यसंगीताची मेजवानी असलेली मैफल आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये श्रीधर पाटणकर व करुणा पटवर्धन यांचे सादरीकरण होणार आहे.
याचबरोबर मंदिर परिसरात दि. २८ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता ‘हसवा- फसवी’ हे विनोदी नाटक श्री गणेश प्रासादिक नाट्यमंडळ गणपतीपुळे यांच्यामार्फत सादर करण्यात येणार आहे. यामध्ये गजानन जोशी, शिवानी जोशी, श्रीधर घनवटकर, शौनक जोशी, अभिजीत घनवटकर यांनी भूमिका साकारली आहे.
माघी गणेशोत्सवानिमित्त मंदिरात आठवडावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन गणपतीपुळे देवस्थानकडून करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान पदाधिकाऱ्यांसह मुख्य पुजारी श्री. अभिजीत घनवटकर व त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत.