रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचा वेग मंदावला; खडी, चिखलामुळे वाहनचालक त्रस्त!

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिऱ्या ते नागपूर (NH166) या महत्त्वाकांक्षी चौपदरी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून धीम्या गतीने सुरू आहे. अर्धवट कामाने निर्माण झालेल्या चिखलमय रस्त्यांमुळे वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मे महिन्यापर्यंत पूर्ण वेगाने सुरू असलेले हे चौपदरीकरणाचे काम अचानक मंदावले आहे. सुरुवातीला मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या टप्प्यातील कामांपेक्षा अधिक वेगाने या रस्त्याचे काम सुरू होते. मात्र, शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील चंपक मैदानापासून पुढे चार रस्त्यांच्या काहीशा आधी काँक्रिटीकरणाचे काम थांबले आहे.
चार रस्त्यांपासून साळवी स्टॉपपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. साळवी स्टॉप ते जे.के. फाईल थांब्यापर्यंत काँक्रिटीकरणाची एक मार्गिका पूर्ण झाली असून त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. परंतु, जे.के. फाईल कंपनीच्या बाजूने असलेल्या दुसऱ्या मार्गिकेचे (जे.के. फाईल ते साळवी स्टॉप) काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे.
या धीम्या गतीमुळे प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत असून, वळणे, खडी तसेच चिखलमय रस्त्यावरून वाहने चालवताना अपघातांची शक्यताही वाढली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रत्नागिरी शहर परिसरातील रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.