मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट ११ मे पासून होणार नियमित वाहतुकीसाठी खुला!
चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण-खेड तालुक्यांना जोडणाऱ्या परशुराम घाटातील वाहतुकीवर चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी मागील काही दिवसांपासून निर्बंध आणण्यात आले होते. चौपदरीकरणा अंतर्गत घाटात तयार करण्यात आलेल्या मार्गिकेच्या भरावाचे बहुतांश काम पूर्ण झाल्यामुळे हा घाट नियमित वाहतुकीसाठी 11 मे पासून खुला करण्यात येणार आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परशुराम घाटातील अवघड वळणावरील काम वाहतूक सुरू असताना पूर्ण करणे कठीण जाऊ लागल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी 25 एप्रिल ते 10 मे 2023 या कालावधीसाठी अंशतः बंद करण्यात आला होता. या कालावधीत दुपारी बारा ते पाच यावेळी हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. वाहतूक बंदी असलेल्या कालावधीत महामार्गावरील वाहतूक खेड तालुक्यामधील चिरणी -लोटे मार्गे वळवण्यात आली होती.
घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या चौपदरीकरण कामांतर्गत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची एक मार्गीका येत्या डिसेंबर मध्ये पूर्णपणे खुली करण्याच्या सूचना ठेकेदार कंपन्यांना दिल्या आहेत. त्यानुसार हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चिपळूण तसेच खेड तालुक्यांना जोडणाऱ्या परशुराम घाटातील भरावाचे काम बहुतांश पूर्ण झाल्यामुळे नियोजनानुसार दिनांक 11 मे पासून हा घाट मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीसाठी नियमितपणे खुला केला जाणार आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आणि त्याबाबत होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष याबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जन आक्रोश समितीने आज दिनांक ७ मे रोजी नवी मुंबईतील कामोठे येथून दुचाकी रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. या रॅलीतून महामार्गाच्या कामाच्या पूर्ततेसाठी कोकणवासीयांना जागृत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
देशभरातील इतर राष्ट्रीय महामार्ग यांच्या कामाची गती पाहता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम दशकभराहून अधिक कालावधी रखडल्यामुळे उच्च न्यायालयाने ताशेरे मारले. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या रत्नागिरी दौऱ्यात येत्या डिसेंबरमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची एक मार्गीका पूर्णपणे वाहतुकीसाठी खुली केली जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा सत्यात उतरेल की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे. महामार्गाच्या काम रखडलेल्या संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड या टप्प्यातील कामाने अजूनही म्हणावी तशी गती पकडलेली नाही. त्यामुळे ना. नितीन गडकरी यांनी घोषणा केल्याप्रमाणे हा महामार्ग डिसेंबरमध्ये एका लेन पुरता का होईना वाहतुकीसाठी खुला होईल की नाही, अशी शंका उपस्थित झाली आहे.