महाराष्ट्रराजकीयलोकल न्यूज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

रायगड :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आज राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमाचे रायगड जिल्ह्यातील मोर्बा येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग पहिवहन महामंडळ,भरत गोगावले, अध्यक्ष स्थायी समिती, पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालय, भारत सरकार सुनिल तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, सचिव, महिला व बाल विकास विभाग डॉ.अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त कोकण डॉ.राजेश देशमुख, आयुक्त महिला व बाल विकास विभाग डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना डॉ.कैलास पगारे,जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका पनवेल मंगेश चितळे आदी उपस्थित होते.

महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार आहे, हा आहेर थांबणार नाही असे भावनिक आश्वासन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ही योजना सुपरहिट असून दिवाळीपूर्वीच महिलांना भाऊबीज देण्यात आली आहे. आज सर्व महिला भगिनीच्या खात्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे जमा झाले आहेत. आज राज्यातील महिलांच्या खात्यात 17 हजार 200 कोटी रुपये जमा केले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, माझी महिला भगिनी कष्ट करते, कुटुंबासाठी राबते याची आम्हाला जाणीव आहे, अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 2 कोटी 26 लाखहुन अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले महिला व बालविकास विभागाने सचिव अनुपकुमार यांच्या नियंत्रणाखाली अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे.

राज्य शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे. ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे. लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

जखमी महिलांवर तात्काळ उपचार करण्याचे निर्देश

रायगडमधील या कार्यक्रमासाठी येणाऱ्या बसला गोरेगावमध्ये अपघात झाला आहे. एक एसटी बस घसरली आहे. या सर्व महिलांवर तात्काळ उपचार करून त्यांना सुखरूप घरी पोहोचवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे.
राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केली. तसेच महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजनाही सुरू आहे त्यामुळे राज्यातील महिला समाधानी असून लाडकी बहीण योजनेतून ते आपले व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे श्री पवार यांनी सांगितले. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याने पुढील काळातही योजना अशीच चालू राहील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यशासनाने शेतकऱ्यांसाठी विज बिल माफी योजना आणलेली असून या अंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची वीज बिल माफी देण्यात आली आहे.शासन सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे असल्याने त्यांच्या हितासाठी अधिक लक्ष दिले जात आहे. हे शासन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला व्हिडीओद्वारे शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक भाषणात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आजचा दिवस हा महिला व बालविकास विभाग म्हणून अभिमानाचा दिवस आहे नवरात्रीत सर्व देवींची पूजा केली जाते. येथे उपस्थित सर्व महिला देवींच्या लेकी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या तिनही लाडक्या भावांनी राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक बळ दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. प्रत्येक स्त्री ही आपल्या परिवारासाठी संसारासाठी जगत असते, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे आता महाराष्ट्रातील स्त्री ही स्वतःसाठी जगणार आहे. ही योजना भविष्यात निरंतर चालावी यासाठी शासनाने आर्थिक नियोजनासह तरतूद केली आहे.

लाडक्या बहिणींना विविध लाभांचे वाटप
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना एकूण 17 हजार 200कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत, त्याचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात 10 महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच पिंक ई- रिक्षा, लेक लाडकी योजना, मोफत गॅस सिलेंडर यासह अन्य योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. व्यासपीठावर ते चालत येत असताना दोन्ही बाजूच्या उपस्थित शेकडो महिलांनी दोघांना राख्या बांधल्या व ही योजना अशीच निरंतर चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व रमाईमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button