रत्नागिरी जिल्हास्तरावरही २३ जूनला ‘ऑलम्पिक डे’ साजरा करणार !
रत्नागिरी, दि. १९ : जागतिक ऑलम्पिक समितीच्या स्थापनेचा दिवस म्हणून २३ जून रोजी ‘ऑलम्पिक डे’ साजरा करतात. जिल्हास्तरावरही ‘ऑलम्पिक डे’ व ‘ऑलम्पिक सप्ताह’ साजरा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.
ऑलम्पिक डेचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध खेळाच्या एकविध खेळ संघटना, शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, एन. सी. सी., नेहरू युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांनी आपा-पल्या स्तरावर क्रीडाविषयक प्रचार व प्रसार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार, व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद व कार्यशाळा याचे
आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
जगातील सर्वोत्तम क्रीडा महोत्सव ऑलम्पिकची स्थापना ग्रीस येथे दि. २३ जून १८९४ साली पियर डी कौवटीन यांनी केली. आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती तसेच जगातील सुमारे २०० पेक्षा अधिक देशाचे ऑलम्पिक संघ हे जागतिक ऑलम्पिक समितीच्या स्थापनेचा दिवस म्हणून २३ जून रोजी ऑलम्पिक डे साजरा करतात. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे
भारतीय ऑलम्पिक संघ व राज्याचे महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन हे सन १९५२ सालापासून ऑलम्पिक डे व ऑलम्पिक सप्ताह साजरा करीत आहेत.