राजकीय पक्षांनी मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक : उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड
रत्नागिरी, दि. २६ : राजकीय पक्षांनी बुथ लेवल एजन्ट अर्थात मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक आहे. त्यांची यादी संबंधित मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे द्यावी, अशी सूचना उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाच्या अमंलबजावणी संदर्भात आज राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली. बैठकीला नायब तहसिलदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे संकेत कदम, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अरुण नागवेकर उपस्थित होते.
25 जून ते 24 जुलै घर ते घर सर्वेक्षण होणार आहे. या दरम्यान राजकीय पक्षांनी नवीन मतदारांना नाव नोंदणीसाठी प्राधान्य द्यावे, असे सांगून उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड म्हणाले, 25 जुलै रोजी प्रारुप यादी प्रसिध्द होईल. यानंतर 9 ऑगस्टपर्यंत त्यासंदर्भातील दावे हरकती दाखल कराव्यात. विशेष मोहिमेबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून शनिवार आणि रविवारबाबतच्या तारखा नंतर कळविण्यात येतील. 19 ऑगस्ट रोजी आलेल्या दावे हरकती जे निराकरण करुन अंतिम यादी प्रसिध्दीबाबत निर्णय घेण्यात येईल. 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल.
राजकीय पक्षांनी मतदार केंद्रांबाबत काही सूचना असतील तर त्या द्याव्यात. त्याचबरोबर बीएलओ (मतदान केंद्र अधिकारी) ॲपच्या धर्तीवर राजकीय पक्षांकडून बीएलए ॲपबाबत आलेली सूचना आयोगाला कळविण्यात येईल.