उद्योग जगतब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयलोकल न्यूज

राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर : ना. नितेश राणे

  • जहाज उद्योगांविषयीचे धोरण ठरवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
  • जहाज बांधणी उद्योगात 18 हजार कोटी गुंतवणुकीसह 3 लाख 30 हजार रोजगार निर्मिती

मुंबई, दि. २९: राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. तसेच या धोरणाच्या माध्यमातून राज्यात 2047 पर्यंत 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 3 लाख 30 हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचेही मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते.

जहाज उद्योगाविषयी धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, या धोरणामुळे राज्यात जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, जहाज पुनर्वापर आणि जहाज तोडणी या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येणार आहे. तसेच या माध्यमातून देशाच्या 5 ट्रिलीयन अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा महत्वाचा वाटा असणार आहे. देशातील सुमारे 33 टक्के जहाज उद्योग हा राज्यात सुरू व्हावा आणि 2030 पर्यंत राज्यात जहाज उद्योगामध्ये 6 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 40 हजार रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट आहे. तसेच या क्षेत्रात गुंतवणूक यावी यासाठी नुकताच मत्यव्यवसाय व बंदरे विभागाने नेदरलॅंडचा दौरा केला आहे. त्यावेळी राज्यात अडीच ते तीन हजार कोटी गुंतवणुकीची तयारी तेथील कंपन्यांनी दाखवली आहे. या धोरणामुळे या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ राज्यातच तयार करण्यासाठी युवक युवतींना प्रशिक्षण देण्याची तरतुदही या धोरणामध्ये करण्यात आली असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.

मंत्री राणे म्हणाले की, या धोरणातील तरतुदीनुसार राज्यात येणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ ही संस्था सहकार्याचे काम करेल. या माध्यमातून महाराष्ट्र सागरी मंडळास महसुलाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊन मंडळाची स्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसेच कुशल मनुष्यबळ राज्यात तयार होणार असल्याने राज्यातील युवक युवतींना रोजगाराच्या मोठ्या संधी भविष्यात निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सागरी व्यापार आणि उद्योगास जालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. जहाज निर्मितीमध्ये देशाचा क्रमांक उंचावण्यासाठी या धोरणाचा उपयोग होणार असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.

राज्याला एक प्रमुख जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर केंद्र बनवणे, कौशल्य आणि उत्पादकता यावर भर देणारे कुशल मनुष्यबळ तयार करणे, प्रकल्प अंमलबजावणीकरिता तांत्रिकदृष्ट्या प्रगत क्षेत्राला प्रोत्साहन देणे, संशोधन आणि विकासामध्ये महत्वपूर्ण गुंतवणूक आणि सहकार्याद्वारे नाविन्यपुर्णतेस चालना देणे, रोजगार निर्मिती हे या धोरणाची ध्येय आहेत. या धोरणानुसार पुढील प्रमाणे विकासाचे मॉडेल असणार आहे. सागरी शिपयार्ड समुह स्थापना व जागा निश्चित करणे (30 कि.मी. च्या परिघात), एकल शिपयार्ड आणि जहाज पुनर्वापर सुविधांचा विकास, पायाभूत सुविधा, पुरक उद्योग व कौशल्य सुविधा उपलब्ध करणे, विकासासाठी यंत्रणा उभी करणे.विकास यंत्रणांकडून एमएमबीच्या पुर्वपरवानगीने विकास, एमएमबी पारदर्शक निविदा पद्धतीने खासगी विकासकांना जमीन वाटप करेल. भांडवली अनुदान –प्रकल्प किंमतीच्या 15 टक्के, कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन, कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी आर्थिक सहाय्य 50 टक्के किंवा 1 कोटी, संशोधन आणि विकास सुविधांसाठी प्रोत्साहन 60 टक्के किंवा 5 कोटी रुपये, या प्रमाणे असणार आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button