राज्यातील ८० हजार न. प. कर्मचाऱ्यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय
नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना न. प. राज्य कर्मचारी संघटनेकडून निवेदन
उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) : राज्यातील नगर परिषद, नगर पंचायत मधील ८० हजार कर्मचाऱ्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी/संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुरेश पोसतांडेल यांनी दिली आहे. त्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात शासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते. शासन स्तरावर मुख्यमंत्री तसेच प्रधान सचिव यांच्यासोबत बैठकाही पार पडल्या परंतु आतापर्यंत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत मधील ८० लाख कर्मचा-यांची शासनाच्या विरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. शासनाने कर्मचा-यांचे शंभर टक्के वेतन कोषागारामार्फत करावे, नगरपंचायतीच्या राहिलेल्या सर्व कर्मचा-यांचे सरसकट समावेशन विनाअट करावे, १०,२०,३० चा पदोनित्तीचा लाभ तात्काळ लागू करावा, स्वच्छता निरिक्षकाचे समावेशन करून तात्काळ पदस्थापना द्यावी, यासह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
दि. ३१ ऑगस्टपर्यंत यावर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा ८० लाख कर्मचारी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश पोसतांडेल यांनी आक्रमण भूमिका घेत थेट बहिष्काराचे अस्त्र उपसल्याने शासन आता काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.