रायगड जिल्हाधिकारीपदी डॉ. योगेश म्हसे यांची नियुक्ती
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखाप्रमुख, प्रांताधिकारी, तहसीलदारांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
अलिबाग (जिमाका) : रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्या रिक्त पदी जिल्हाधिकारी म्हणून डॉ. योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.म्हसे आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पदावर रुजू झाले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे,जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम, जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशट्टी, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, विट्ठल इनामदार, अमित शेडगे, उमेश बिरारी, ज्ञानेश्वर खुटवळ,अजित नैराळे तसेच सर्व तहसिलदारांनी डॉ.म्हसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नूतन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे हे यापूर्वी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. एक धडाकेबाज कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या डॉ.योगेश म्हसे यांची भिवंडी-निजामपूर मनपा आयुक्त, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारकीर्द विशेष गाजली होती.