रायगड जिल्हास्तरीय पेन्शन अदालत २३ डिसेंबरला
सेवानिवृत्ती वेतन प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी आयोजन
अलिबाग : रायगड जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी हे सन- 2022 -2023मध्ये निवृत्त होणार आहेत किंवा झालेले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील राज्य शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे कार्यालयीन स्तरावर तसेच वेतन पडताळणी पथकाकडे व रजा मंजुरीच्या कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत.
या अनुषंगाने विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे जलद गतीने निपटारा करण्याकरिता शुक्रवार, दि.23 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3.00 वा.जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जिल्हास्तरीय “पेन्शन अदालत” आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या पेन्शन अदालतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.