राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद होण्याची शक्यता
संगमेश्वर : गेल्या बारा वर्षांपेक्षा अधिक काळ ठेकेदार आणि प्रशासन यांनी कोकणवासीयांचा अक्षरशः अंत पहायचे ठरवले असून दरवर्षी पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास खडतर बनत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर मधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी धामणे येथील नदीलगत मोठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळा तोंडावर असताना हे काम हाती घेतल्याने सध्या ते अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी येथील चालू स्थितीतील रस्ता आता खचू लागला असल्याने वाहनांना धोका निर्माण झाला आहे.
संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण
संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरवात झाली आहे . पावसाळ्यापूर्वी संरक्षण भिंतीचे काम जर पूर्ण होणार नव्हते, तर ते हाती का घेतले ? असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला आहे. ठेकेदार कंपनी अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणी काम करत असून वाहन चालकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली गेलेली नाही. असे सद्यस्थितीवरून दिसून येते.
सुरक्षेसाठी मातीचे ढिगारे
धामणी येथे नदीलगत रस्ता रुंद करण्याच्या हेतूने नदीपात्राचा विचार न करता संरक्षण भिंत उभारण्याचे काम महिनाभरापूर्वी हाती घेण्यात आले. जर हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नव्हते, तर येथील रस्ता का खोदून ठेवला असा सवाल आता वाहनचालक उपस्थित करत आहेत. सद्यस्थितीत या भिंतीचे काम पंचवीस टक्के देखील पूर्ण झाले नसून बाजूने खोदलेला रस्ता आता खचू लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंते हे काम सुरू झाले त्यावेळी उपस्थित नव्हते का ? असा संतप्त सवाल वाहन चालकांनी विचारला आहे . संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होण्यास जर तीन महिन्यांचा कालावधी लागणार होता, तर पावसापूर्वी महिनाभर हे काम हाती घेऊन महामार्गास धोका उत्पन्न करणाऱ्या ठेकेदार कंपनीसह कामावर नियुक्त अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे. धामणी येथे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्या ठिकाणी मातीचे छोटे छोटे ढीगारे ओतून ठेवण्यात आले असून यामुळे वाहनांची सुरक्षा होणार आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
ठेकेदार कंपनीला डिझेलचा तुटवडा
धामणी येथील रेल्वे ओव्हर ब्रीजच्या जवळ महामार्ग धोकादायक बनला आहे . सध्या डिझेल तुटवडा असल्याने काम बंद असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची दिली . रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती वाहन चालकांनी व्यक्त केली आहे . या ठिकाणी पर्यायी रस्ता नसल्याने महामार्ग बंद होऊन वाहतूक पूर्णतः ठप्प होण्याची भीती आहे. ज्या कारणामुळे महामार्ग ठप्प होऊ शकतो अशी स्थिती असताना ठेकेदार कंपनीकडे डिझेल नसल्याने कामाला गती मिळत नसल्याचे विधान हास्यास्पद असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते परशराम पवार यांनी दिली. रस्ता खचण्याची स्थिती असताना डिझेलचा तुटवडा आहे असे सांगणे म्हणजे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याचे पवार यांनी नमूद केले.
पहिल्याच पावसात खड्डे
पावसाला सुरुवात झाल्यानंतर धामणी ते बावनदी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसाळ्यापूर्वी डायव्हर्जन आणि अन्य ठिकाणी ठेकेदार कंपनीने डांबरीकरण न केल्याने बांधकाम मंत्र्यांनी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी परशुराम पवार यांनी केली आहे. महामार्गावर पहिल्याच पावसानंतर डोंगराची माती येऊन चिखल होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे दुचाकी स्वार घसरून पडत असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. ठेकेदार कंपनीच्या अशा बेदबाबदारपणामुळे धामणी ते बावनदी दरम्यान मोठ्या पावसात महामार्ग ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.