‘लोटिस्मा’च्या वस्तुसंग्रहालयाला मिळाली तब्बल ४०० वर्षांपूर्वीची श्रीलक्ष्मीनारायण मूर्ती
बदलापूरच्या काळे कुटुंबियांनी अनेक पिढ्या जपलेली पुरातन मूर्ती
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तूसंग्रहालयात एक मोलाची भर पडली आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची श्रीलक्ष्मीनारायणची मूर्ती संग्रहालयासाठी मिळाली आहे. ही मूर्ती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील सुभाष अनंत काळे यांच्या अनेक पिढया पूजेत होती. मनुष्यरूपी गरुडावर आरूढ असलेल्या चतुर्भुज भगवान श्रीविष्णू आणि वामांगी बसलेली लक्ष्मी अशा प्रतिमेला ‘लक्ष्मीनारायण’ अशी संज्ञा आहे.
काळे यांनी ही मूर्ती वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयाला देण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी बदलापूरला जाऊन काळे कुटुंबीयाची भेट घेतली. धनंजय चितळे यांनी मूर्तीची पंचोपचारे उत्तरपूजा करून ही मूर्ती स्वीकारली. चारशे वर्षांपूर्वीची गंडकी शिळेतील ही मूर्ती ५५ सेंटीमीटर उंच आणि ३५ सेंटीमीटर रुंद आहे. गरूडावर बसलेल्या विष्णूच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असून दोन्ही हात जोडलेल्या गरूडाच्या चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आहेत. गरुडाच्या जोडलेल्या हातात गदा व दंडाभोवती सर्पवेढा आहे. श्रीविष्णू व लक्ष्मी सालंकृत आहे. भगवान श्रीविष्णू सायुध सिद्ध आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे.
२०२१ साली चिपळूणला आलेल्या महापुरात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे वस्तूसंग्रहालयाचे नुकसान झाले होते. पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केलेल्या सहकाऱ्यांमुळे लवकरच संग्रहालय पुन्हा सुरू होणार आहे. या श्रीलक्ष्मीनारायण मूर्तीमुळे संग्रहालयात आलेल्या समृध्दी वाढली असल्याच्या भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केल्या आहेत.