विश्वबंधुत्वाचा संदेश घेऊन मुंबई ते कन्याकुमारी सायकल सवारी!
दापोली सायकल क्लबच्या सुरज भुवड व सचिन पालकर यांचा उपक्रम
दापोली : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती बंधुत्व हा संदेश घेऊन दापोली सायकलिंग क्लबचे सुरज भुवड आणि सचिन पालकर हे दोघे मुंबई ते कन्याकुमारी असा १६०० किमीचा सायकल प्रवास करत आहेत. २३ जानेवारी २०२३ रोजी ते दापोली येथे पोहोचले असता दापोलीकरांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ही सायकल मोहीम सोबत कोणतीही बॅकअप गाडी न घेता सुरु आहे. स्वतःचे साहित्य स्वतःच्या सायकलवर असून दररोज ८० ते १५० किमी अंतर सायकल चालवली जात आहे. याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की दैनंदिन धावपळीच्या जीवनात ऑफिस नोकरी सुरु असताना स्वतःसाठी थोडा वेळ काढून ही १५ दिवसाची सायकल मोहीम आखली गेली आहे. मार्गावरील नवीन प्रदेश, तिथली संस्कृती, जीवनशैली यांचा अनुभव आस्वाद घेण्यासाठी सायकल प्रवास हा एक चांगला पर्याय आहे. ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांकडून स्वागत पाहुणचार होत आहे. पर्यावरण रक्षण, सायकलचे महत्व, स्वामी विवेकानंदानी जगाला दिलेला बंधुत्वाचा संदेश याबद्दल प्रबोधन चर्चा जनजागृती करत आणि अनेक स्थानिक विषयांवर गप्पा गोष्टी करत सायकल प्रवास सुरु आहे.
दापोली तालुक्यातील आंबवली गावातील सुरज भुवड (वय २५ ) हा आयआयटी मुंबई येथे नोकरीस असून प्रभादेवी येथील सचिन पालकर (वय ४३) यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. घरच्यांचा पाठिंब्यामुळेच अशा आव्हानात्मक सायकल मोहीमेचे नियोजन शक्य झाले असे त्यांचे म्हणणे आहे.
मुंबईहून सुरु झालेला हा सायकल प्रवास पुढे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, केरळ मार्गे असेल. दापोलीकरांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळेला दापोली सायकलिंग क्लबचे केतन पालवणकर, संदीप भाटकर, सुरज शेठ, सर्वेश बागकर, विनय गोलांबडे इत्यादी उपस्थित होते. सुरज आणि सचिनला शुभेच्छा देण्यासाठी ८०९७५७६७३१, ९८१९८७९३६० या नंबरवर संपर्क करु शकता.