ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय
शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

मुंबई: “निवडणुकीत मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई पुसून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करणे किंवा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारे शाई पुसली तरी संबंधित व्यक्तीला पुन्हा मतदान करता येणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही,” असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांनी दिले आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ‘शाई पुसण्याच्या’ व्हिडिओंवर आयोगाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रवृत्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत.
शाईबाबत आयुक्तांचे महत्त्वाचे मुद्दे:
- निवडणूक आयोगाचीच शाई: राज्य निवडणूक आयोग २०११ पासून मार्कर पेनचा वापर करत आहे. ही तीच शाई आहे जी केंद्रीय निवडणूक आयोग (ECI) वापरते.
- शाई सुकण्यासाठी वेळ: बोटावर शाई लावल्यानंतर ती सुकण्यासाठी साधारणतः १२ ते १५ सेकंदांचा कालावधी लागतो. तोपर्यंत मतदार केंद्राच्या आतच असतो.
- पुन्हा मतदान अशक्य: जरी कोणी शाई पुसण्याचा प्रयत्न केला, तरी मतदार यादीत एकदा नोंद झाल्यावर आणि स्वाक्षरी/अंगठा घेतल्यावर त्या मतदाराला पुन्हा मतदान करण्याची मुभा मिळत नाही. सर्व नोंदी अचूक ठेवल्या जातात.
- सोशल मीडिया अफवांवर विश्वास नको: सॅनिटायझर किंवा ॲसिटोनने शाई निघते, असे सांगणारे व्हिडिओ दिशाभूल करणारे आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





