शिक्षकांचे प्रश्न सोडविणे ही आमची जबाबदारी : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरीत खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन
रत्नागिरी : शिक्षक वर्ग जो महाराष्ट्राला, देशाला घडवतो त्यांचे प्रश्न सोडविणे, ही आमची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे केले.
जयेश मंगल पार्क, रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ राज्यव्यापी अधिवेशन 2023 आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षा आमदार उमाताई खापरे, माजी आमदार बाळ माने, राजेंद्र निकम, विठ्ठल उनमुडे, कृष्णाजी हिरेमठ, दीपक गवळी आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील प्राध्यापकांचा प्रश्न, संघटना जरी वेगवेगळया असल्या तरी त्यांचे प्रश्न, अडीअडचणी प्रामाणिकपणे सोडविण्याचे काम हे सरकार करीत आहे. शिक्षक वर्गाचे प्रश्न सोडविणे, ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. शिक्षकांनी आम्हाला घडविले त्यांच्यामुळे आपण आज मंत्री झालोय, याची प्रामाणिक जाणीव आपल्याला आहे.
ते पुढे म्हणाले, न्यू एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी केजी ते पीजी केली तर देश शैक्षणिकदृष्टया बलशाली होऊ शकतो. एवढी ताकद न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे. पॉलिसीची अंमलबजावणी करताना आपल्या अडीअडचणी सोडविण्याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही घेतली पाहिजे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची, त्याचा पाठपुरावा करण्याची आपली जबाबदारी आहे.
पालकमंत्री म्हणाले,जुन्या पेन्शन योजनेबाबत शिंदे -फडणवीस सरकार सकारात्मक आहे, त्याबाबत हे सरकार सकारात्मक पाऊले टाकत आहेत. शिक्षक, शिक्षकेतर यांच्या सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, त्यांना न्याय देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करु. संघटनेनेदेखील आंदोलनासारखी टोकाची भूमिका घेण्याआधी सरकारशी आपल्या प्रश्नासंदर्भात चर्चा करणे, संवाद साधणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ राज्यव्यापी अधिवेशन 2023 मध्ये नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.