शिमग्याच्या फाकांनी होलिकोत्सवात रंगत ; गावोगावी माड नाचवत आणले
रत्नागिरी : ‘होळी रे होळी, आमच्या देवाला पुरणाची पोळी’ ‘हुर्रा रे हुर्रा आमच्या देवाला सोन्याचा तुरा’ अशा फाकांमुळे कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या परंपरांनुसार सोमवारी व मंगळवारी गावच्या सहाणेवर होम पेटवले जाणार आहेत. यासाठी दरवर्षीप्रमाणेच चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावी दाखल झाले आहेत.
फाल्गुन शुद्ध पंचमी अर्थात फाक पंचमीपासून वाड्या वाड्यावर मागील दहा दिवसांपासून होळ्या पेटवल्या जात होत्या. या होलिकोत्सवाची सांगता गावच्या सहाने वर त्या त्या गावातील परंपरानुसार माड ( मुख्य होळी ) उभा करून होम प्रज्वलित केल्यानंतर दहा दिवस सुरू असलेल्या होलिकोत्सवाचा शेवट करण्याची प्रथा आहे. बऱ्याच गावांमध्ये गावच्या सहानेवर मुख्य होम पेटवल्यानंतर ग्रामदेवतांची पालखी घरोघरी दर्शनासाठी फिरवण्याची प्रथा आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीच्या दर्शनासाठी तसेच पालखी नाचवण्यासाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीनिमित्त राहत असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणातील आपल्या गावी दाखल झाले आहेत.
यावेळी कोकण रेल्वे तसेच एसटीने चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली आहे. मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांनी गावी येण्यासाठी रेल्वेला पसंती दिल्यामुळे मागील काही दिवस गुजरात तसेच मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्यांना मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वेने यावेळी मुंबई सीएसएमटी पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस, अहमदाबाद, उधना जंक्शन तसेच पुणे येथून कोकणसाठी ज्यादा गाड्या सोडल्या आहेत. चिपळूणपर्यंतच्या प्रवाशांसाठी खास शिमग्यासाठी कोकण रेल्वेने रोहा ते चिपळूण अशी मेमू पॅसेंजर गाडी सोडली आहे. रेल्वेकडून यावेळी चिपळूणसह रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव तसेच मंगळूरु पर्यंत विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.
गाव गावच्या प्रथांनुसार सोमवार तसेच मंगळवारी जिल्ह्यातील आणि गावांमध्ये होऊन पेटवले जाणार आहेत. हो माझ्या आदल्या दिवशी गावातील मुख्य होमासाठी माड तोडून आणण्यात आले. त्यासाठी चाकरमान्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. अशीच गर्दी पालखी नाचविण्यासाठी देखील पाहायला मिळणार आहे.