रत्नागिरी जिल्हा बँकेची ५ हजार कोटींच्या वर व्यवसाय झेप !

रत्नागिरी : जिल्ह्यातील जनतेने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर विश्वास दर्शवला आहे. बँकेचा तब्बल 5 हजार कोटींच्या पुढे व्यवसाय गेला आहे. यावर्षी बँकेच्या इतिहासात प्रथमच 94 कोटी 64 लाख रुपये इतका विक्रमी असा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती आरडीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली.
बँकेला सन 2024 – 25 मध्ये 94 कोटी 64 लाख एवढा ऐतिहासिक विक्रीमी ढोबळ नफा झाला आहे. वर्षअखेर बँकेच्या ठेवी 22866.87 कोटी तर कर्जव्यवहार 2199.64 कोटी इतका झाला आहे. तर 5066.51 कोटी एकूण व्यवसाय झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये 230.70 कोटीने वाढ झाली आहे. तर कर्जामध्ये 195.34 कोटींनी वाढ झाली आहे. तर बँकेच्या व्यवसायामध्ये 426.4 कोटीने वाढ झाली आहे. त्याचबरोबर ढोबळ नफ्यामध्ये 26.11 कोटीने वाढ झालेली आहे. बँकेचा ढोबळ एनपीए 2.91 टक्के असून नक्त एनपीए 0.0 इतका आहे. सलग 13 वर्ष नक्त एनपीए 0 टक्के असून सलग 14 वर्ष बँकेने ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त केला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी डॉ. तानाजी चोरगे यांच्यासह उपाध्यक्ष बाबाजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, संचालक अॅड.दिपक पटवर्धन, राजेंद्र सुर्वे, जयंत जालगांवकर, दिशा दाभोळकर, रमेश कीर, रामभाऊ गराटे, आदी उपस्थित होते.
बँकेच्या एकूण 76 शाखा असून प्रधान कार्यालयासह तालुकास्तरावरील व तालुक्यातील इतर शाखा मिळून 28 शाखा स्वमालकीचे जागेमध्ये कार्यान्वित केले आहेत. जिल्ह्यातील ग्राहकांसाठी 19 ठिकाणी एटीएम मशीन कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामुळे ग्राहकांना पैसे काढणे सुलभ जात आहे. त्याचबरोबर बँकींग सेवा पुरवण्यासाठी 3 मोबाईल, एटीएम व्हॅन कार्यरत आहेत. डिटीजल बँकींग सेवा तसेच सातबारा खाते उतारा सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यात आर्थिक साक्षरता केंद्र कार्यरत केली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे व महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, छोटे-मोठे उद्योजक व शैक्षणिक संस्था यांना 25 लाखापर्यंत 5 टक्के दराने कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.
बँकेतर्फे 100 संगणक संच, जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळांना देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षात 50 संगणक व उर्वरित सन 2024-25 या आर्थिक वर्षात देण्यात आले आहेत. बँकेने सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात बँकेचे आकस्मिक निधीमधून नैसर्गिक आपत्ती, जळीतग्रस्त, उत्कृष्ट खेळाडू, मुलींच्या अनाथ आश्रमाकरिता तसेच दिव्यांग मुलांचे वसतिगृहाकरिता, साहित्य संमेलन, शेतकरी कार्यशाळा इत्यादी कारणांसाठी 55 लाख 85 हजार रुपयांचे आर्थिक मदत केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेला आतापर्यंत तब्बल 19 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये नाबार्ड, फॅसिलिटेड सीबीएस प्रोगॅ्रम पुरस्कार, महाराष्ट्र शासन सहकार निष्ठ पुरस्कार, बँकींग फ्रंटीयर्स पुरस्कार, महाराष्ट्र शासन सहकार भूषण पुरस्कार, इंटेलिक्चुअल पिपल्स फाऊंडेशन, दिल्ली पुरस्कार आदींचा समावेश आहे.