श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखचा स्थापना दिन उत्साहात संपन्न
देवरुख : श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखचा स्थापना दिन श्री सत्यनारायणाची पूजा, ज्येष्ठ वाचक व बालवाचकांचा सन्मान आणि श्री. चंद्रशेखर ठाकूर यांचा ‘मराठी नाटकातील सौंदर्यस्थळे’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रमाने उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मुख्य कार्यक्रमात प्रसिद्ध आर्थिक सल्लागार, वृत्तपत्र स्तंभलेखक चंद्रशेखर ठाकूर यांच्या हस्ते वाचकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ वाचक विभागातून सुनंदा जेरे, उमा जागुष्ट्ये, वासुदेव टिकेकर, मनोहर माने, चंद्रकांत आठल्ये, तर बालवाचक विभागातून शौर्य शिंदे, प्रसाद जाधव यांचा समावेश होता. या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी, कार्यवाह राजेंद्र राजवाडे, पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.
चंद्रशेखर ठाकूर यांनी ‘मराठी नाटकातील सौंदर्यस्थळे’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमात मराठी नाटकांचा सुवर्णकाळ आणि त्यातील गाजलेल्या नाटकातील सौंदर्यस्थळे यांच्या धावत्या सफरीचा आढावा घेतला. डॉ. वर्षा फाटक यांनी मुलाखतवजा साधलेल्या प्रश्नोत्तरातून श्री. ठाकूर यांनी मराठी नाटकाचा सुवर्णकाळ, आपल्या अभिनयाने रंगभूमीवर ठसा उमटवणाऱ्या कलावंतांची कारकीर्द, स्मरणात असलेले संवाद सादर करत उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.
वाहतो ही दुर्वांची जुडी, तो मी नव्हेच, नटसम्राट, अश्रूंची झाली फुले या सदाबहार नाटकातील सौंदर्यस्थळे सांगताना त्यातील गाजलेल्या संवादांच्या सादरीकरणातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नट म्हणजे अभिनेता आणि स्टार यांच्यातील फरक, तसेच मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातील दोन अभिनेत्यांच्या संवाद फेकीतील फरक उपस्थित प्रेक्षकांसमोर सादर करून वातावरण भारून टाकले. या कार्यक्रमाची सांगता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाण्याने झाली. स्थापना दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनासाठी ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर, सहाय्यक ग्रंथपाल अमृता इंदुलकर, अर्चना राणे, नरेंद्र खेडेकर तसेच वाचनालय पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांनी मेहनत घेतली.