संगमेश्वरमध्ये छ. संभाजी महाराज स्मारकाजवळ ‘अजित पवारांना साक्षर करा’ आंदोलन
भाजपच्या आंदोलनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अजित पवार यांनी माफी मागावी : प्रमोद जठार
देवरूख (सुरेश सप्रे) : ज्यांना इतिहास माहिती नाही, त्यांना इतिहास शिकवण्याची वेळ आली आहे. शंभू राजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा भाजप त्यांच्या घरासमोर आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव, माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला.
संगमेश्वर तालुका भाजपच्या वतीने अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कसबा येथील धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्याजवळ अजित पवारांना साक्षर करा आंदोलन करण्यात आले.
यावेळी जठार यांनी आपल्या सडेतोड शैलीत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, त्या औरंग्यासमोर ४० दिवस देह सोलला जाऊन, डोळे फोडून घेऊनही स्वधर्म, स्वराज्य यांचा त्याग न करणारे ‘धर्मवीर’ छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीतच तर फक्त स्वराज्य रक्षक आहेत म्हणणाऱ्या अजित पवार यांची मती ताळ्यावर आणण्यासाठी हे आंदोलन आहे. अशा लोकांना सदबुद्धी देण्यासाठी आता प्रत्यक्ष धर्मवीर संभाजी राजेंनाच साकडे घालण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत अजित पवार माफी मागत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट केले. यापुढे दरवर्षी ११ मार्चला याच ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन केले.
तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी यावेळी, अजित पवार यांचा जाहीर निषेध करत आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी खेड येथील शाहीर विठोबा साळवी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत शंभू राजांचा पराक्रम वर्णन केला. याला उपस्थितांनी उदंड प्रतिसाद दिला.
यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, महिला तालुकाध्यक्ष कोमल रहाटे, राजु भाटलेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कदम, रामदास राणे, संतोष केदारी, नगराध्यक्ष सौ. मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव कदम, यशवंत गोपाळ, राजा गवंडी, विनोद म्हस्के, मिथुन निकम, डॉ अमित ताठरे, प्रसाद भिडे, तुकाराम किर्वे, रेश्मा किर्वे, राहुल फाटक, सुशांत मुळ्ये, मंदार गानू, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद जोशी, पांडुरंग फाटक, पंढरीनाथ मोहिरे, भिडे, सुधीर यशवंतराव, प्रमोद शिंदे, धनंजय पाथरे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.