महाराष्ट्र

सचिन धर्माधिकारी यांचा मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मान

सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे
सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : आज या ठिकाणी कोणी गडगंज श्रीमंत असेल, तर ते सचिनदादा आहेत. कारण नानासाहेब आणि अप्पासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम ते करत आहेत. सचिनदादांना डिलिट या पदवीने सन्मानित करणे म्हणजे सद्गूरु परिवाराच्या प्रत्येक सदस्याचा सन्मान आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. जगात अनेक विद्यापीठे असली तरी माणूस घडविणारे खरे विद्यापीठ हे रेवदांड्याला असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राजस्थान येथील श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठच्या वतीने सद्गुरू परिवाराचे सचिनदादा धर्माधिकारी यांना त्यांच्या निस्वार्थी समाज कार्याबद्दल आज मानद डॉक्टरेट पदवीने (डिलिट) सन्मानित करण्यात आले. वाशीतील सिडको एक्झीबीशन सेंटर येथे आयोजित दीक्षांत सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
यावेळी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठचे अध्यक्ष डॉ. विनोद टीबरेवाला, डॉ. सचिनदादा धर्माधिकारी, सौ. स्वरुपा सचिनदादा धर्माधिकारी, केंद्रीय मंत्री पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार पूनम महाजन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवीमुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, विशाल टीबरेवाला, उमा विशाल टीबरेवाला, श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठाचे सर्व विश्वस्त तसेच मुंबई आणि कोकणाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आलेले सद्गुरु परिवाराचे सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नानासाहेबांच्या स्मृतीला वंदन करुन पद्मश्री महाराष्ट्र भूषण अप्पासाहेबांचे स्वागत केले. सचिनदादांचे अभिनंदन करताना श्री. शिंदे म्हणाले की, आपण सर्व भाग्यवान आहोत. कारण आपल्याला नानासाहेब आणि अप्पासाहेबांसारख्या महान व्यक्तींचा सहवास मिळाला. मी देखील आपल्याच परिवाराचा सदस्य आहे. मला योग्य मार्गदर्शन, प्रेरणा आणि सतत काम करण्याची उर्जा अप्पासाहेबांकडून मिळते. माझा मानसिक ताणतणाव वाढतो त्यावेळी मी देखील बैठकीस जातो. बैठकीतून समाधान प्राप्त होते. ज्यांच्यावर संकटं येतात, दु:ख येतात त्यांना दिशा आणि मार्गदर्शन देण्याचे काम अप्पासाहेबांनी केले आहे.

धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात सामाजिक कामे केली जातात. ज्याठिकाणी शासन पोहचत नाही त्याठिकाणी प्रतिष्ठानाचे सदस्य पोहोचतात. श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठाने सचिनदादांच्या समाज कार्याची दखल घेऊन खऱ्या व्यक्तीमत्वाला पदवी बहाल केली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, साधूसंतांचे विचार मिळाले की, मानवी जीवन समाधानी होते. बैठकीत जाणाऱ्यांना काय मिळते, तर मानसिक समाधान मिळते. समाजाला प्रबोधनाची आवश्यकता आहे. अंत:करणाची स्वच्छता केल्याशिवाय समाजाची, परिसराची आणि निसर्गाची स्वच्छता करता येणार नाही. मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे. दिवसभरात आपण समाजासाठी काय केले याचे रोज आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले की, आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा दिवस आहे. डिलिट हा पदवी प्रदानाचा असा कार्यक्रम जगाच्या पाठीवर एवढया मोठया अथांग जनसागरा समोर पहिल्यांदाच होतो आहे. सचिनदादांना डॉक्टरेट ही पदवी दिल्यानंतर त्या पदवीचा मान वाढला आहे. आपल्या विचारांनी आणि प्रेरणांनी जमवलेली माणसे हीच खरी संपत्ती असते, त्यामुळे अप्पासाहेबांसारखा श्रीमंत जगात कोणी नाही. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी अप्पासाहेबांचे आशिर्वाद मिळाले ही माझ्यासाठी माझ्या वाढदिवसाची अमूल्य भेट आहे. कार्यक्रमाच्या शेवटी श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विनोद टीबवारेवाला म्हणाले की, आम्ही आतापर्यंत 18 राज्यपाल, अभिनेत्री हेमा मालिनी, बासरी वादक हरीप्रसाद चौरसीया, इस्कॉनचे सुरदास प्रभु अशा नामवंत प्रसिध्द व्यक्तींचा सन्मान केला आहे. हा आमच्या विद्यापीठाचा 9 वा दीक्षांत समारंभ आहे. परंतु असा समारंभ यापूर्वी कधीच झाला नाही. इतक्या मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती मी पहिल्यांदाच पाहिली. आमच्या विद्यापिठात स्वच्छतेचे कार्यक्रम केले जातात त्यासाठी आम्ही धर्माधिकारी प्रतिष्ठानचे मार्गदर्शन घेऊ.

यावेळी डिलीट पदवी दिल्याबद्दल श्री सचिन धर्माधिकारी यांनी आभार व्यक्त करून श्री नानासाहेब धर्माधिकारी व श्री आप्पासाहेब धर्माधिकारी हे खरे विद्यापीठ असून त्यांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी अश्या सन्मानामुळे आणखी प्रेरणा मिळाली असल्याची भावना व्यक्त केली. श्री. सचिन यांच्या पत्नी श्रीमती स्वरूपा यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने सद्गुरू परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button