सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांना पुण्यतिथीदिनी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे अभिवादन
अलिबाग, दि. ५ : “गाज” फाऊंडेशन आणि अलिबाग नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या 294 व्या पुण्यतिथीनिमित्त आंग्रे स्मारक परिसर, अलिबाग येथे आज जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, भारतीय नौदलाच्या पश्चिमी कमांड मधील भा.नौ.पो. आंग्रे चे कमांडिग ऑफिसर कमोडोर आदित्य हाडा, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर श्री.प्रशांत गोजरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्याधिकारी श्रीमती अंगाई साळुंखे, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे तसेच माजी नगराध्यक्ष श्री.प्रदीप नाईक,माजी उपनगराध्यक्षा सौ. मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक श्रीमती वृषाली ठोसर, नगरपालिका शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, दुर्ग संवर्धन विषयक काम करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच अलिबागकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंग्रे समाधी परिसर येथून सागरी सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण जागरूकता हेतूने सागरी सीमा मंच च्या माध्यमातून दुचाकी रॅलीचा कमोडोर आदित्य हाडा आणि रघुजीराजे आंग्रे यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला.
या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन रघुजीराजे आंग्रे यांचे “गाज” फाऊंडेशन आणि अलिबाग नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
आंग्रे स्मारक परिसर येथील कार्यक्रमानंतर कमोडोर आदित्य हाडा यांचा जेएसएम महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याशी संवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात कमोडोर श्री.हाडा यांनी नाविक दलातील विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी रायगड जिल्हा पोलिसांच्या पथकाने देखील मानवंदना दिली. तसेच जेएसएम महाविद्यालयातील एन.सी.सी च्या पथकाद्वारे कमोडोर आदित्य हाडा यांना “गार्ड ऑफ ऑनर” ची सलामी देण्यात आली.
गाज फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि इतर सशस्त्र दलांच्या सेवा संधींबाबत वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातील,असे सूतोवाच रघुजीराजे आंग्रे यांनी यावेळी केले.