सरपंच डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करू शकत नाही
शासनाच्या ग्रामविकास विभागाचे पत्रक
रत्नागिरी जिल्ह्यातील हरपुडे येथील सरपंचांचे पद धोक्यात
रत्नागिरी : ग्रामपंचायतीचा सरपंच हा ग्रामपंचायतीमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करू शकत नाही, अशा आशयाचे पत्रक महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानच्या संचालकांनी मागवलेल्या अभिप्रायावर दिले आहे. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातील हरपुडे ग्रामपंचायतीमध्ये डेटा इन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या सरपंचावर आता या पत्रकानुसार कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत सरपंच हा डाटा एन्ट्री म्हणून ऑपरेटर म्हणून काम करत असल्यास हे ग्रामपंचायत अधिनियम 19 59 च्या कलम 14 फ चे उल्लंघन असल्याचे ग्रामविकास विभागाने या पत्रकात म्हटले आहे. रायगड मधील ग्रुप ग्रामपंचायत शेडसई मधील उपसरपंच हेच डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत असल्याबाबतच्या प्रकरणात राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे संचालकांनी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे अभिप्राय मागवला होता.
यावर उत्तर देताना ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की,ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र हे ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली असून येथील केंद्र चालकांना ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून मानधन अदा करण्यात येते. उपरोक्त अभियानातील तरतुदी विचारात घेता उपसरपंच व केंद्र चालक या पदावर एकाच व्यक्तीला काम करता येणार नाही. ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 14 फ अन्वये जी व्यक्ती पंचायतीच्या नियंत्रणाखाली किंवा पंचायतीच्या स्वाधीन असलेले कोणतेही वेतनी किंवा लाभार्थीपद धारण करत असेल अशी व्यक्ती, असे पद धारण करत असेल त्या मुदतीत, पंचायतीचा सदस्य असणार नाही किंवा सदस्य म्हणून असल्याचे चालू राहणार नाही.असा दाखला ग्राम विकास विभागाने दिला आहे.परिणामी ग्रामविकास विभागाच्या या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी एप्रिल 2022 मध्ये डेटा इन्ट्री ऑपरेटर पदावर काम करणाऱ्या हरपुडे ग्रामपंचायत सरपंचांबाबत दिलेल्या निर्णयावर याचा परिणाम होणार आहे.
आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. अशा प्रकरणात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडून अभिप्राय मागवायला हवा होता! सरपंचच डेटा एन्ट्री ऑपरेटर असेल तर ग्रामीण लोकशाही मुळात धोक्यात येते. नागरिकांची काम खोळंबतात. सरपंच कामाला गेल्यास ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटर जागेवर नसतो. चुकीचे पायंडे यामुळे पडू शकतात.
–सुहास खंडागळे, संघटन प्रमुख
गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा
रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी सरपंच हे डाटा एन्ट्री ऑपरेटर असल्याबाबत त्यांचे पद रद्द होत नसल्याचा निर्णय एप्रिल 2022 मध्ये दिला होता. मात्र त्यानंतर 29 जुलै 2022 मध्ये, म्हणजेच अवघ्या तीन महिन्यात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने डाटा एन्ट्री ऑपरेटर हे सरपंच पदावर किंवा सदस्य पदावर राहू शकत नाहीत असे पत्रक संचालक राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान यांना काढल्यामुळे हरपुडे सरपंच यांच्यावर कारवाईचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे.