महाराष्ट्र

सर्वसामान्यांसाठी महाआरोग्य मेळावा लाभदायक : ना. उदय सामंत

रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून आज रत्नागिरीमध्ये महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना होणार असून सर्वसामान्यांचा आजारपणामुळे होणारा आर्थिक भार थोडासा हलका करण्याच्या दृष्टीने महाआरोग्य मेळावा महत्वाचा ठरणार आहे, असे राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिपादन केले.

या महाआरोग्य मेळाव्याचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले त्यावेळी ते बोलत होते. महाआरोग्य मेळाव्याचे दामले विद्यालय, मारुती मंदीर, नाचणे रोड येथे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


आज राज्यात हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 500 मोफत दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. या माध्यमातून जनतेला मोफत आरोग्य सुविधा मिळणार आहेत अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. आज आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांना यावेळी पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.


यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सांगितले, अत्यंत कमी कालावधीमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय व प्रशासनाने हा मेळावा उत्तम पध्दतीने आयोजित केला आहे. या शिबिरामध्ये सहभागी डॉक्टर्स व कर्मचारी यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी कौतूक केले. या मेळाव्यामध्ये तज्ञ डॉक्टर्स तपासणी करणार असून नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर आज सकाळी 09.00 ते सांयकाळी 05.00 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या ठिकाणी अवयव दान, देहदान, नेत्रदान नोंदणी कक्ष, रक्तदान शिबीर, आभा कार्ड व आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी, नेत्र तपासणी, कान, नाक, घसा तज्ज्ञांकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी, इसीजी व कार्डीओलॉजिस्टकडून तपासणी व जिल्हा रुग्णालयात आवश्यकता पडल्यास 2 डी इको तपासणी, जनरल सर्जरी, स्त्री रोग तज्ज्ञांकडून तपासणी, त्वचारोग व कुष्ठरोग निदान, अस्थिरोगतज्ञ तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, बालरोग तज्ज्ञ व बालरोग सर्जनकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, मेंदूविकार तज्ज्ञांकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, आयुष विभाग, असंसर्गजन्यरोग तपासणी, समुपदेशन व उपचार, एड्स कंट्रोल सोसायटी, दंत चिकित्सा व उपचार, मानसोपचारतज्ज्ञ तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
पालकमंत्री उदय सामंत यांनी महाआरोग्य मेळाव्याची प्रत्यक्ष पाहणी केली. महाआरोग्य मेळाव्यामधील उपचार करणारे डॉक्टर्स व उपस्थित नागरिक यांच्याशी संवाद साधला.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button