महाराष्ट्रराष्ट्रीयलोकल न्यूज
सारडेचा स्वप्नोज म्हात्रे १८४० प्रशिक्षणार्थींत फायरिंगमध्ये पहिला
महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन ; स्वप्नोज म्हात्रे भारतीय सेनेत दाखल
उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील सारडे येथील हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील स्वप्नोज म्हात्रे हा भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून दाखल झाला आहे. यासाठी त्याने नाशिक येथे गरुड झेप अकॅडमीत तीन वर्षे प्रशिक्षण घेतले. तेथे त्याने फिटनेस आणि भारतीय सेनेत दाखल होण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याने अग्निवीर म्हणून परीक्षा दिली. नुकतेच त्याने आठ महिन्यांचे प्रशिक्षण हैदराबाद येथे घेतले. तेथे तो १८४० प्रशिक्षणार्थींत फायरिंगमध्ये पहिला आला आहे. त्यामुळे त्याची नुकतीच भारतीय सेनेत हिमाचल प्रदेशमध्ये निवड झाली आहे.
महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन ; स्वप्नोज म्हात्रे भारतीय सेनेत दाखल
भारतीय सेनेत दाखल होणारा स्वप्नोज हा सारडे गावातील पहिलाच तरुण आहे. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी ‘सुखकर्ता’ बंगल्यावर शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन स्वप्नोजचे अभिनंदन केले आणि देशाचे मोठे कर, अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वप्नोजचे वडील शशिकांत म्हात्रे म्हणाले, “आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती. २०१३ मध्ये सारडे ग्रामपंचायतीचा मी सरपंच होतो. तेव्हाही आणि आजही मी एका हॉटेलमध्ये काम करतो. त्यामुळे स्वप्नोज भारतीय सेनेत दाखल झाल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आमचे स्वप्न त्याने पूर्ण केले; परंतु त्याच्या शैक्षणिक वाटचालीत महेंद्रशेठ घरत यांनी उत्तम सहकार्य केले आहे. ते माझ्या कायम लक्षात राहील. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.





