हर्णै समुद्रात गस्ती नौकेने पकडल्या बेकायदा मासेमारी करणार्या दोन बोटी

रत्नागिरी : एलईडी दिव्यांच्या प्रकाशात मासेमारी करण्यास बंदी असतानाही दापोली तालुक्यातील दाभोळ हर्णे समुद्रात बेकायदा मासेमारी करताणाऱ्या दोन नौका फिशरीज विभागाच्या गस्ती पथकाने पकडल्या आहेत. रत्नागिरी येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत सुमारे 12 ते 15 लाख रुपयांचे एलईडी दिवे, जनरेटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ज्या नौकांवर हे साहित्य आढळून आले त्या दोन्ही नौका पुढील कारवाईसाठी रोखून ठेवण्यात आल्या आहेत. रायगडातील राजश्री आणि रत्नागिरीतील भाविका नावाच्या या दोन नौका जयगड बंदरात आणून रोखून ठेवण्यात आल्या आहेत.या गस्तीवेळी राजश्री आणि भाविका या दोन नौका एलईडी दिव्यांच्या प्रकाशात मासेमारी करत असल्याचे आढळून आले. सहाय्यक आयुक्त आनंद पालव यांच्या निर्देशानुसार समुद्रात गस्त घातली जात आहे.
सहाय्यक मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी, पार्थ तावडे, स्वप्नील चव्हाण सुरक्षा रक्षकांसोबत मत्स्य व्यवसाय विभागाच्या नौकेने गस्त घालत असताना रात्रीच्या वेळी या दोन नौका एलईडी मासेमारी करत असल्याचे दिसून आले.या दोन्ही नौकांवरील जनरेटर व इतर एलईडी साहित्य जप्त करण्यात आले असून दोन्ही नौका जयगड बंदरात आणून रोखून ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आता सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांच्यासमोर सुनावणी होऊन दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.