दृष्टीहीन अजय, सागरचे ‘रेस अक्रॉस इंडिया’ सायकल स्पर्धेत दिव्य यश
काश्मिर ते कन्याकुमारी ३७५८ कि.मी. अंतर सायकलने ९ दिवसात पूर्ण
रत्नागिरी : दृष्टीहीन दिव्यांग सागर बोडके नाशिक आणि अजय लालवानी मुंबई या दोघांनी रेस ॲक्रॉस इंडिया सायकल स्पर्धेत सहभागी होऊन चार पायलट रायडर्स उल्हास कुलकर्णी नाशिक, अंबरीश गुरव दापोली, सुशील सारंगधर मुंबई, शिवम खरात मुंबई यांच्यासोबत रीले पद्धतीने टँडम सायकल चालवत श्रीनगर काश्मिर ते कन्याकुमारी ३७५८ किमीची सायकल राईड ९ दिवस १२ तास ४ मिनिटे या वेळात पूर्ण करुन एक नवा जागतिक विक्रम रचला आहे. याची दखल ब्रावो बुक ऑफ इंटरनॅशनल अवॉर्ड यांनी देखील घेतली आहे.
पायलट रायडर दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, टँडम सायकलवर दोघेजण बसू शकतात. यावर पुढे पायलट रायडर बसतो त्याच्याकडे हँडल, गिअर, ब्रेक असे पूर्ण सायकलचे नियंत्रण असते. मागील सीटवर दिव्यांग दृष्टीहीन स्टोकर बसतो. या दोघांनाही समन्वय साधत पायंडल मारावे लागतात. आंतरराष्ट्रीय दर्जाची आशियातील सर्वात लांब अंतराची रेस अक्रॉस इंडिया ही स्पर्धा १० ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीनगरहुन सुरु झाली. या स्पर्धेत पहिल्यांदाच टँडम सायकल चालवत दिव्यांग अजय सागरची टीम, रेस टू व्हिजन नावाने सहभागी झाली होती. स्पर्धकांवर जीपीएस प्रणालीद्वारे लक्ष ठेवले जाते. दिवस रात्र, ऊन, पाऊस, थंडी, रस्त्यावरील चढ उतार, रहदारी, रस्ता दुरुस्तीची कामे, सायकल बिघाड इत्यादी विविध अडचणींवर मात करत सहकाऱ्यांच्या मदतीने, शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लावणारी खडतर अशी ही आव्हानात्मक अल्ट्रासायकलिंग स्पर्धा यशस्वीपणे विक्रमी वेळात पूर्ण झाली. यासाठी सर्वांनी खूप सराव केला होता.
टीम रेस टू व्हिजन सहकारी संकेत भानोसे, डॉ अनिल बारकुल, रामेश्वर चव्हाण, सतिश जाधव, लखन लालवानी, महेश दाभोळकर, संतोष संसारे, गिरीश, अमितकुमार इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेसाठी हॅपी ह्युमन्स फाउंडेशन, बीडचे बारकुल हॉस्पिटलचे डॉ अनिल, निओ रोटरी क्लब मुंबई, ठाणे रोटरी क्लब, समर्थ व्यायाम मंदिर दादर, नासिक सायकलिस्ट, सक्षम नाशिक, गरुडझेप संस्थांचे डॉ संदीप भानोसे, नॅब युनिट महाराष्ट्र, आरसीई एज्युकेशन, आईशा फाऊंडेशन, ब्लाइंड वेल्फेअर, मानवधन, दापोली सायकलिंग क्लब, बींईगअप फाऊंडेशनचे भूषण संसारे इत्यादी संस्थांचा मदतीचा हात मिळाला. दृष्टीहीन दिव्यांग सागर आणि अजय यांची ही श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल राईड नक्कीच कौतुकास्पद आणि अनेकांना प्रेरणा देणारी आहे.