Konkan railway | कोकण रेल्वेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत सामंजस्य करार!

- केआरसीएल–एनएचएआय सामंजस्य करारामुळे पायाभूत सुविधांना नवे बळ
मुंबई : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्यात पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. रेल्वे–रस्ता समन्वय, लॉजिस्टिक्स, बोगदे व पूल, उतार सुरक्षा (Slope Safety), प्रवासी व चालकांसाठी सुविधा तसेच स्मार्ट सोल्यूशन्स या क्षेत्रांत संयुक्तपणे काम करण्याचा या कराराचा उद्देश आहे.
हा महत्त्वाचा करार केआरसीएलचे संचालक (वर्क्स अँड वर्कशॉप्स) श्री. राजीव कुमार मिश्र आणि एनएचएआयचे अध्यक्ष श्री. संतोष कुमार यादव यांच्या उपस्थितीत तसेच दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साक्षीने करण्यात आला.
कराराचे प्रमुख मुद्दे
रेल्वे–रस्ता कनेक्टिव्हिटी: बंदरे, औद्योगिक क्षेत्रे व लॉजिस्टिक हब्सना जोडण्यासाठी समन्वित प्रकल्प
लॉजिस्टिक्स व मालवाहतूक: मल्टिमोडल लॉजिस्टिक्सला प्रोत्साहन
बोगदे व पूल: अवघड भौगोलिक भागात सुरक्षित व
आधुनिक संरचना
उतार व भूस्खलन सुरक्षा: डोंगराळ भागात प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
प्रवासी सुविधा व स्मार्ट सोल्यूशन्स: डिजिटल प्रणाली, स्मार्ट मॉनिटरिंग, सुविधा केंद्रे
विकासाला गती
या सामंजस्य करारामुळे कोकण व इतर भागांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील. रेल्वे व महामार्ग प्रकल्पांमधील समन्वय वाढल्याने वाहतूक, सुरक्षितता, आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मिती यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.





