Mumbai Goa highway | महामार्गावर केमिकलवाहू टँकरच्या आगीचा थरार; वाहतूक एका लेनवरून वळवली

राजापूर : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पन्हळे, माळवाडी येथे रसायन वाहून नेणार्या टँकरला लागलेला आगीचा थरार पाहायला मिळाला. या घटनेनंतर यंत्रणांची धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांसह नगर परिषदेचा अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी पोचला आणि त्या नंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गोव्यावरुन मुंबईच्या दिशेने केमिकल वाहून नेणारा टँकर तालुक्याती पन्हळे माळवाडी येथे आला असता त्याला अचानक आग लागली. हवेत धुराचे लोट पसरल्याने ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली. स्थानिकानी घटनास्थळी धाव घेत लागलीच गोव्याहून मुंबईच्या दिशेने असणारी वाहतूक थांबवून ती दुसर्या एकेरी मार्गावरुन वळवण्यात आली होती..
या घटनेत टँकरच्या चाकांनीही पेट घेतला. घटनास्थळी हवेत धुराचे लोट उसळले होते. घटनेची खबर मिळताच पोलिस यंत्रणेसह राजापूर नगर परिषदेचा अग्निशमक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. या घटनेत गाडीचे किती नुकसान झाले ते समजू शकले नाही.