Nitesh Rane : मंत्री नीतेश राणे यांचे अटक वॉरंट रद्द
- नीतेश राणे, आमदार नीलेश राणेंसह ४२ जण कुडाळ न्यायालयात हजर
कुडाळ : ओबीसी आंदोलनाच्या सुनावणीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) सोमवारी कुडाळ दिवाणी न्यायालयात हजर झाल्याने त्यांच्यावरील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावर ओबीसीसंदर्भात चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी पालकमंत्री राणे यांच्यासह ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणा संदर्भातील दोषारोपपत्र येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पाठविण्यात आले होते. मात्र, या खटल्याच्या सुनावणीला नीतेश राणे हजर राहत नसल्यामुळे त्यांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए. कुलकर्णी यांनी अटक वॉरंट जारी केले होते. या खटल्याची सुनावणी सोमवारी येथील न्यायालयात होती.
ओबीसी आंदोलनामधील सर्व संशयित सोमवारी कुडाळ न्यायालयासमोर हजर झाले. त्यातील पालकमंत्री राणे तसेच धोंडी चिंदरकर यांच्या विरुद्ध जामीन पात्र वॉरंट होते. त्यांचे वॉरंट रद्द करण्यात आले. याकामी अॅड. विवेक मांडकुलकर यांच्यासह अॅड राजीव कुडाळकर, अॅड गौरी देसाई यांनी काम पाहिले.





