उद्योग जगतब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयलोकल न्यूज

Taj Group | शिरोडा-वेळाघर येथील ताज समूहाच्या ‘५ स्टार’ हॉटेलबाबतच्या पूरक करारसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय

  • पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न
  • सामंजस्य करार आणि मोबदल्याचा प्रश्न निकाली : ग्रामस्थांना दोन टप्प्यांत मिळणार मोबदला

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी एक मोठे पाऊल पडले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-वेळाघर येथे ताज समूहाच्या (मे. इंडियन हॉटेल कंपनी प्रा. लि.) ( Taj Group) वतीने जिल्ह्यातील पहिले आलिशान ‘५ स्टार हॉटेल’ उभारले जाणार आहे. या प्रकल्पाबाबतच्या पूरक करार पत्रासंदर्भात आज राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली.


सामंजस्य करार आणि मोबदल्याचा प्रश्न निकाली
या बैठकीत हॉटेल उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच MTDC (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ), स्थानिक ग्रामस्थ आणि ताज समूह यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या ग्रामस्थांच्या हिताचा विचार करून, त्यांना दोन टप्प्यांमध्ये मोबदला देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा मोबदला जास्तीत जास्त एक ते दोन हप्त्यांत पूर्ण करावा आणि या जमिनीसंदर्भातील प्रलंबित असलेले सर्व कायदेशीर दावे (केसेस) मागे घेण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत प्रशासनाला व संबंधित प्रतिनिधींना दिल्या.


जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार नवी उंची
सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले असून, ताज समूहासारख्या प्रतिष्ठित ब्रँडच्या आगमनामुळे येथील आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री खा. नारायण राणे यांनी ताज ग्रुपचे ५ स्टार हॉटेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी त्याबाबत पुढील पावले उचलली असून ताज हॉटेलच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प शिरोडा वेळागर येथे साकारला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन अधिक सक्षम होईल व जिल्ह्याच्या अर्थकारणाला देखील अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
बैठकीस मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन माध्यमातून), ताज समूहाचे वरिष्ठ प्रतिनिधी, संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी आणि शिरोडा-वेळाघरचे ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने जिल्ह्याभरात आनंदाचे वातावरण आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button