महाराष्ट्र

शिक्षणाचा उपयोग देशाच्या समृद्धीसाठी करावा : राज्यपाल रमेश बैस

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४१ वा पदवीदान समारंभ उत्साहात

रत्नागिरी : शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा असे प्रतिपादन राज्यपाल श्री रमेश बैस यांनी आज डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केले.

विद्यापीठाचा 41 वा पदवीदान समारंभ दापोली येथील अध्यापिठाच्या डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास प्रकुलपती व कृषी मंत्री अब्दुल सत्तार केंद्रीय कृषी विश्वविद्यालय इंफाळ येथील कुलपती व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ. एस. अय्यपन तसेच रत्नागिरी व रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत तसेच आमदार योगेश कदम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.भरत साळवी आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.


कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर आणि कोकण विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण पवार,जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांतधिकारी शरद पवार आदींची ही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे अशा पार्श्वभूमीवर शेतीला अधिक महत्त्व प्राप्त होणार असून येणाऱ्या काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखले जातील असे राज्यपाल महोदय आपल्या भाषणात म्हणाले.


भावी पिढ्यांसाठी शेतीमधील गुंतवणूक आणि त्यातील उत्पादन यांचे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे असे राज्यपाल महोदय यावेळी म्हणाले.
आजच्या या समारंभात राज्यपाल महोदय यांच्या हस्ते 34 पीएचडी 105 पदव्युत्तर पदवी आणि 2105 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याच कार्यक्रमात वर्ष 2020 21 आणि 21 22 अंतर्गत सुवर्णपदक विजेत्यांचाही राज्यपाल महोदयांच्या हस्ते गौरव करण्यात आला याव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील सुवर्णपदक विजेत्यांना पदकासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. एस. अय्यपन यांचे प्रमुख भाषण यावेळी झाले यात त्यांनी जागतिक स्तरावर कृषी उत्पादनात भारत अग्रेसर ठरलेला आहे. यापुढील काळात तज्ञ व शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या माध्यमातून यात भर घालण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.
विद्यापीठाचे प्रतिकूलपती व राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आगामी काळात कृषी विद्यापीठांमधील सर्व सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल असे राज्यपाल महोदयांनी आपल्या विधानसभेतील अभिभाषणात सांगितले होते, त्याची पूर्तता कृषी विभाग करेल आणि कृषी विभागांतर्गत सर्व पदे भरली जातील याची काळजी शासन घेत आहे असे सांगितले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांचे प्रास्ताविक भाषण झाले त्यांनी यात आजवर झालेल्या विद्यापीठातील संशोधनांची माहिती सादर केली तसेच विद्यापीठ राबवित असलेले विविध उपक्रम आणि संशोधने याबाबत माहिती दिली.
पदवीदान सोहळ्यापूर्वी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शन चे उद्घाटन राज्यपाल श्री बैस यांच्या हस्ते झाले. त्यांनी स्वतः यातील प्रत्येक दालनास भेट देऊन विविध संशोधनांची माहिती जाणून घेतली.

विद्यापीठ परिसरातील हेलीपॅडवर राज्यपाल महोदयांचे आगमन झाले त्यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यावेळी राज्यपाल महोदयांचे स्वागत केले. विद्यापीठाचे कुलगुरू तसेच जिल्ह्यातील महत्त्वाचे अधिकारी या ठिकाणी राज्यपाल महोदयांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button