ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराष्ट्रीय

अजंठा कॅटमरॉन बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित ; प्रवासी वाहतुकीवर निर्बंध

  • महाराष्ट्र सागरी मंडळाची त्रिसदस्य समिती करणार चौकशी
  • दोषींवर कडक कारवाई करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे आदेश

मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबाग नजीक समुद्राजवळ अजंठा कंपनीच्या कॅटमरॉन प्रवासी बोटीच्या घटनेप्रकरणी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे त्रिसदस्य चौकशी समिती महाराष्ट्र सागरी मंडळाने स्थापन केली असून ती या दुर्घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करणार असून तीन दिवसात समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.

दुर्घटनेतील बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना हा तत्काळ निलंबित करण्यात आला असून नोंदणी प्रमाणपत्र तसेच सर्वे प्रमाणपत्र देखील मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या बोटीस पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

अजंठा कंपनीची प्रवासी बोट काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास 130 प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा येथे जाण्यासाठी निघाली होती. भर समुद्रात मांडवा जेट्टी पासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असताना बोटीमध्ये समुद्राचे पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. त्यावर बोटीवरील कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी मांडवा जेट्टी येथे संपर्क साधून तातडीची मदत मागितली मांडवा जेट्टी परिसरात समुद्रात असलेल्या बोटींनी तत्काळ प्रवाशांची मदत करून अपघातग्रस्त बोटीवरील प्रवाशांना दुसऱ्या बोटी मध्ये घेऊन मांडवा जेट्टी येथे बोटींमध्ये सुरक्षित व सुखरूपरीत्या पोहचवले.

या घटनेमुळे बोटीवरील प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झाली होती. याबाबत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आणि सदर दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

मंत्र्यांच्या या आदेशानुसार महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी प्रदीप बढीये यांनी त्रिसदस्य समितीची घोषणा केली असून सागरी अभियंता चीफ सर्वेअर प्रकाश चव्हाण हे या समितीचे अध्यक्ष असणार असून, बांद्रा येथील प्रादेशिक बंदर अधिकारी सी .जे. लेपांडे हे सदस्य तर कमांडंट संतोष नायर जे सागरी सुरक्षा व संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ते या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती सदर घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करून त्याबाबतचा सविस्तर आणि स्पष्ट अहवाल घटनेच्या कारणमीमांसासह तसेच शिफारसीसहित तीन दिवसात महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणार आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या घटनेबाबत बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांच्या जीवित्ताशी खेळण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत असताना अशा घटना टाळण्यासाठी बोटींची नोंदणी तसेच तांत्रिक बाबींबाबत सुस्पष्ट नियमावली तयार करण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी विभागाला दिले आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button