आंजर्ले, वेळास गावांना मिळाली कासवांचे गाव म्हणून ओळख!
कासव संवर्धनातील कामाची राष्ट्रीय स्तरावरून दखल
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधील वेळास तसेच दापोली तालुक्यातील आंजर्ले या गावांना आता कासवांचे गाव’ म्हणून ओळख मिळाली आहे. ऑलिव्ह रीडले या दुर्मिळ कासव प्रजातीच्या गावाच्या योगदानाची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर या दोन्ही गावांना नवीन ओळख मिळाली आहे.
भारतीय वन सेवा पर प्रधान मुख्य वनरक्षक डॉक्टर बेन यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही गावांना भेट देऊन कासव संवर्धनासाठी तेथे होत असलेल्या कामाची प्रशंसा केली होती.
मागील अनेक वर्षांपासून मंडणगडमधील वेळास तसेच दापोलीतील आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धनासाठी भरीव असे काम झाले आहे. कासवाच्या विणीच्या हंगामात दूरवरचा सागरी प्रवास करून कासव वेळास तसेच दापोलीतील आंजर्ले समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी येत असतात. ही बाब हेरून या दोन्ही किनाऱ्यावर कासवप्रेमी नागरिकांकडून कासवाची अंडी संवर्धन करून त्यातून पिल्ले निघेपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते. यातूनच पुढे या किनाऱ्यावर कासव महोत्सव ही भरू लागले.
राष्ट्रीय पातळीवरील वन अधिकाऱ्यांकडून या गावांमध्ये कासव संवर्धनासाठी होत असलेल्या कार्याची दखल घेऊन देशपातळीवर वेळास तसेच आंजर्ले गावाला कासवांचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे.