औषध दानामध्ये तोगरे दांपत्याचा विक्रम!
एक कोटी ५४ लाख ४९ हजार रुपयांची औषधे केली दान
औषध गोळ्या दानाचे समाजकार्य तोगरे कुटुंबियांकडून अविरतपणे सुरूच!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : वयाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरून औषध दानाचे सेवाभावीपणे कार्य करणाऱ्या करणाऱ्या टोगरे दाम्पत्याने आतापर्यंत २५ जिल्ह्यांमध्ये ९८ सरकारी रुग्णालय तसेच ४८ नोंदणीकृत संस्थांना तब्बल एक कोटी ५४ लाख ४९ हजार तीनशे रुपयांची औषधे दान करून विक्रम प्रस्थापित केला आहे.
संग्राम आर. तोगरे(वय ७६) व सुमनताई संग्राम तोगरे(वय वर्षे ६४) हे दांपत्य उरणमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून ते अनेक वर्षांपासून विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांना गोळ्या औषध दान करत आलेले आहेत. वयाची ७५ वर्षे सरूनही तरी त्यांचे हे औषधदानाचे कार्य आजही निःस्वार्थ वृत्तीने अखंडीतपणे सुरूच आहे. वयाने ते ज्येष्ठ असूनही आजही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी फिरून मोफत औषधे दान करत आहेत. तरुणांना लाजवेल, असे त्यांचे हे कार्य आहे. औषधे गोळ्या दान करणे, गोर गरिबांच्या मदतीला धावून जाणे असा जनसेवेचा छंद जोपासताना आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यातील 98 सरकारी रुग्णालयात आणि 48 नोंदणीकृत सामाजिक संस्थांना 1,54,49,300/- ( एक करोड चौपन्न लाख ४९ हजार तीनशें ) रूपयांची मोफत औषद्ये दान देऊन नवा विक्रम केला आहे. सोबत 6 जिल्ह्यातील गरीब गरजूंना त्यांच्या वाड्या पाड्यावर जाऊन नवे जुने सर्व प्रकारचे कपडे आणि 4 जिल्ह्यातील काही आश्रम शाळेत शालेय साहित्य दान दिलेले आहे.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे समाज सेवी रोहित उर्फ बाळासाहेब धुरंधरे, साप्ताहिक शेतकरी राजाचे संपादक व रूग्ण मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष व मातोश्री रुग्णालय,यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे दि.12/2/2023 रोजी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना औषध गोळ्याची गरज असल्यामुळे त्यांनी काही समाजसेवकांना ही गोष्ट बोलून दाखवली. बाळासाहेब धुरंधरे यांना कुणीतरी उरण तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मोफत औषध गोळ्या दान करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले संग्राम तोगरे यांचा फोन नंबर दिल्याने त्यांनी मोफत औषधासाठी संग्राम तोगरे यांना संपर्क केला. संग्राम तोगरे यांनी तत्काळ मान्यता देऊन विनंती केली की औषधे घेऊन जाण्याची व्यवस्था आपणास करावी लागेल, तेव्हा बाळासाहेब धुरंदरे यांनी दिनांक 7-2-2023 रोजी रुग्ण मित्र फाउंडेशनचे आरोग्य दुत मोहन जाधव व सुनिता दिवेकर यांना उरणमध्ये पाठविले. संग्राम तोगरे यांनी 490 प्रकारची औषधे भरलेले बॉक्स त्यांना दान केले.
या प्रसंगी उरणचे प्रसिद्ध व्यापारी तथा उरण तालुका व्यापारी संघाचे सदस्य दिनेश ठक्कर, लाॅयन क्लबचे चेअरमन चंद्रकांत ठक्कर,स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुनिल नाईक, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, अनेक महत्वपूर्ण पुरस्कार विजेते तथा मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळाची अध्यक्षा सुमनताई संग्राम तोगरे, फोटोग्राफर कु.नक्षत्रा महेश तोगरे आणि रुग्ण मित्र संस्थेचे कार्यकर्ते मोहन जाधव व सुनिता दिवेकर उपस्थित होते.
तोगरे कुटुंबिय संपूर्ण महाराष्ट्रात फिरून मोफत औषध गोळ्या देऊन पीडित, गोर गरिबांची सेवा करत आहेत. तेही कोणतेही अपेक्षा न ठेवता. निश्चितच आजच्या स्वार्थी दुनियेत सर्वांना प्रेरणादायी व आदर्श घ्यावा, असे उदाहरण म्हणून तोगरे कुटुंबियांकडे बघायला काहीच हरकत नाही.