किल्ले द्रोणागिरीवर तोफगाडा दुर्गार्पण सोहळा संपन्न
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवराज युवा प्रतिष्ठान आणि सहयोगी संस्थांचे संयुक्त आयोजन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरणमधील द्रोणागिरी किल्ल्याला ब्रिटीश व पोर्तुगीजांपासूनचा इतिहास आहे. अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचे महत्व होते. या किल्ल्यावर अनेक वर्षांपूर्वी काही तोफा असल्याच्या नोंदी आहेत परंतु प्रशासनाच्या निश्कालजीपनामुळे या किल्ल्यावर असलेल्या तोफा गहाळ झाल्या. त्या सर्व तोफांपैकी एक तोफ दुर्गसंवर्धनामध्ये काम करणाऱ्या सर्व संस्थांनी मिळून शोधून ती गडावर नेण्यात आली. या तोफेचे वैभव परत मिळविण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान उरण च्या वतीने लोखंडी तोफगाडा बसविण्यात आला.
ब्रिटीशकाळानंतर बनलेला हा दोनचाकी लोखंडी तोफगाडा हा इतिहासातील पहिलाच तोफगाडा असल्याची माहिती डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली. तसेच या तोफगाड्याची नोंद इतिहास लिहिताना अवश्य घेऊ असे इतिहास अभ्यासक श्री. सुखद राणे यांनी नमूद केले. याआधी सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने चार चाकी लोखंडी तोफगाडे उंदेरी किल्ल्यावर तर लाकडी तोफगाडे कुलाबा किल्ल्यावर बसविले आहेत.
आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या शुभहस्ते तोफगाड्याचे दुर्गार्पण केले. या प्रसंगी, सह्याद्री प्रतिष्ठान चे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे, शिवराज युवा प्रतीष्ठानचे संदेश ठाकूर, उरण सामाजिक संस्थेचे संतोष पवार, शिवशाहीर वैभव घरत, दुर्ग इतिहास अभ्यासक सुखद राणे, भास्कर मोकल, शुभांगीताई पाटील, भरत देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी रायगड भुषण शिवशाहीर वैभव घरत व शिवशाहीर उमंग भोईर यांच्या पोवाड्यांनी वातावरण प्रफुल्लीत झाले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करण्यारे माजी आमदार मनोहर भोईर, शिवशाहीर वैभव घरत, आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर, दुर्गसंवर्धक गणेश तांडेल व दुर्ग इतिहास अभ्यासक कु. अभिषेक ठाकूर यांना सह्याद्री विशेष सन्मान 2023 ने गौरवण्यात आले.