कोकणातील विविध स्थानकांवर वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागताची जोरदार तयारी!
पहिल्या प्रवासासाठी मडगावला निमंत्रितांचे आदल्या दिवशीच आगमन
रत्नागिरी : मडगाव ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ दि.3 जून २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच धावणाऱ्या या गाडीच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. गोव्यात मडगाव येथून शुभारंभाची गाडी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी सुटल्यानंतर सिंधुदुर्ग मध्ये कणकवली, रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण खेड तसेच रायगडमध्ये कोलाड स्थानकावर देखील तिच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.
गोव्यात मडगाव स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 3 जून 2023 रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. उद्घाटन निमित्त रत्नागिरी तसेच मडगाव स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस येणार असलेल्या फलाटावर रंगरंगोटी करण्यासह आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड तसेच कोलाड स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कोकण रेल्वे कडून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.