ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रलोकल न्यूज

खेड, चिपळूणला अवकाळी पावसाने झोडपले ; झाड कोसळून वाहतूक बंद


चिपळूण : मागील काही दिवसांपासून असह्य उकाड्याने नागरिक हैराण झालेले असताना आणि हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चिपळूण, खेड तालुक्यांमधील काही भागांना झोडपले.

कोकण किनारपट्टीवर सध्या असह्य उन्हाळा जाणवत असतानाच शनिवारी (११ रोजी) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसासह वादळी वार्‍याने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडवली. याचदरम्यान, खेड शहरातील ब्राह्मणआळी मार्गावर जुनाट वृक्ष उन्मळून पडल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद पडला होता.

खेड व भरणे परिसरात शनिवारी सकाळपासून उष्मा वाढल्याचे जाणवत होते. त्यामुळे शहरातील रस्त्यावर दुपारी 12 ते 3 या कालावधीत रहदारी विरळ होती. परंतु, उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर अनेकजण चालत, दुचाकी व चारचाकी वाहने घराबाहेर पडले. परंतु सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक ढगांनी गर्दी केली आणि सोसाट्याच्या वार्‍याने हवेत धुरळ्याचे लोळ उठले. वादळ सुटल्याने अनेकांनी सुरक्षित ठिकाण गाठून वारा थांबण्याची वाट पाहिली. शहरात सोसाट्याच्या वार्‍याने धुळीचे लोळ हवेत उठल्याने पडचार्‍यासह दुचाकी व चारचाकी वाहनचालक यांची भीतीने घाबरगुंडी उडाली.

चिपळूण शहर परिसरात देखील शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने तडाखा दिला. शहरासह पोपळी चिपळूण परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक तसेच व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांच्या मात्र तोंडचे पाणी पळाले आहे. पाऊस पडल्यामुळे दर कोसळतील की काय, अशी चिंता अंतिम टप्प्यातील आंबा पीक घेणाऱ्या बागायत धरणा सतावू लागली आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button