चिपळूणमधील लो. टिळक स्मारक वाचन मंदिर वस्तुसंग्रहालय साकारणार दळवटणे सैन्यतळ
शुभारंभ कार्यक्रमाला तंजावरचे महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले, सरसेनापती हंबीरराव मोहिते वंशातील सौ. प्रतिभा सुरेश धुमाळ यांची उपस्थिती
चिपळूण : छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपल्या वस्तूसंग्रहालय प्रकल्पात “दळवटणे सैन्यतळ” प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शुभारंभ कार्यक्रम येत्या मंगळवारी (दि. ११) शहरातील ब्राह्मण साहाय्यक संघाच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे. तंजावरचे महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले शुभारंभ आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते सरसेनापती हंबीरराव मोहिते वंशातील सौ. प्रतिभा सुरेश धुमाळ यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या समारंभात चिपळूणचे आ. शेखर निकम यांच्या हस्ते तंजावरचे महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचा सत्कार केला जाणार आहे. समारंभाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे भूषविणार आहेत. प्रसिद्ध उद्योजक प्रशांत यादव हेही यावेळी उपस्थित राहाणार आहेत. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे चिपळूणशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. आपल्या राज्याभिषेकापूर्वी महाराज चिपळूणजवळच्या दळवटणे येथे एक महिना मुक्कामाला होते. दळवटणे येथे महाराजांचा सैन्यतळ होता. इथेच महाराजांनी हंबीरराव मोहिते यांना ‘सरसेनापती’पदाची वस्त्रे बहाल केली होती. याच दळवटणे सैन्यतळाला उद्देशून, ९ मे १६७४ रोजी छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी दिलेले पत्र ‘आदर्श राज्य कसं असावं?’ याचं उत्तम उदाहरण असून ते जगभरात भाषांतरित करून दर्शनी लावलं जायला हवं अशी वाचनालयाची भूमिका असल्यानेच वस्तुसंग्रहालयात “दळवटणे सैन्यतळ” साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच समारंभात छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. “दळवटणे सैन्यतळ” या ठिकाणी छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांना ‘सरसेनापती’पदाची वस्त्रे बहाल केली होती.
‘लोटिस्मा’च्या वतीने, श्रीछत्रपतींच्या वंशजांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह विनायक ओक, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले आहे.