ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ उद्यादापोलीत सायकल फेरी
दापोली : वाढीच्या व विकासाच्या दृष्टीने माणसाच्या आयुष्याचे चार भाग पाडता येतात. बालपण, तारुण्य (तरुण वय), प्रौढत्व (प्रौढ वय) व वृद्धावस्था (म्हातारपण). घरातील वृद्ध व्यक्तींचा अनुभव नेहमी आपल्या कामी येतो, यामुळे वृद्धांचा सन्मान आदर झालाच पाहिजे. या जेष्ठ नागरिकांना मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि द फर्न समाली रिसॉर्टतर्फे रविवारी २२ जानेवारी २०२३ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती केळसकर नाका- बुरोंडी नाका- फॅमिली माळ- पंचायत समिती- गणेश दत्तात्रय दातार वृध्दाश्रम- नटराज नाका- पोस्ट ऑफिस- आझाद मैदान अशी ५ किमीची असेल. या सायकल फेरी दरम्यान दापोलीतील गणेश दत्तात्रय दातार वृध्दाश्रमामध्ये जाऊन तेथील कार्याबद्दल जाणून घेण्यात येईल.
या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ९६७३७५०५५८, ९०२२८७४८८१ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.