झाडे लावूया, पुन्हा सावली मिळवूया
- धामणी येथील तरुणांचा मुंबई-गोवा महामार्गालगत वृक्ष लागवडीचा उपक्रम
संगमेश्वर दि. ११ : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेली पूर्वीची मोठी झाडे प्रवासी व वाटसरूना सावली देत होती. परंतु या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर ही झाडे तोडण्यात आली. त्यामुळे रस्त्याला सावली मिळणे दुर्मिळ झाले. ऊन्हापासून बचाव करतांना लोकांना सध्या कसरत करावी लागते. धामणी येथील तरुणांनी सामाजिक बांधीलाकीतून रस्त्यालगत वृक्ष लागवड केली आहे.
परंतु कामासाठी झाडे तोडली गेली असली तरीही पुन्हा या रस्त्याच्या कडेला झाडे लावणे गरजेचं आहे. जेणेकरून आतापासूनच प्रत्येकाने यथाशक्ती व उस्फूर्तपणे तसेच सावलीसाठी उपयोगी असणारी झाडे श्रमदान स्वरूपाने वृक्षारोपण करण्यास जर प्रत्येकाने या कामात हातभार लावला तर नष्ट झालेली सावली आपण पुन्हा मिळवू,या निश्चयाने धामणी येथील कांही मंडळींनी आपल्या कामातून वेळ काढून वृक्षारोपण सुरू केले आहे.
आठवड्यातून आपल्या कामातून एकदा एकत्र येऊन अशा प्रकारचे वृक्षारोपण सुरू केले आहे. जी मिळतील ती रोपे घेऊन रस्त्याच्या बाजूला लावूया व पुन्हा सावली मिळवूया,अशा विचाराने प्रत्यक्ष वृक्षारोपणासाठी एकत्र आलेले अजित कोळवणकर , सिद्धेश खातू, प्रथमेश घाणेकर, प्रणव कोळवणकर, स्वप्नील सुर्वे इत्यादींनी याद्वारे चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने समजून एकतरी झाड रस्त्याच्या कडेला लावल्यास गेलेली सावली पुन्हा मिळवण्यास नक्कीच मदत होईल.