नरवण धरणवाडी सोमेश्वर मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डी. पी. गुरव यांचा विशेष सन्मान!
गुहागर : तालुक्यातील नरवण येथील धरणवाडी सोमेश्वर मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष गुणगौरव कार्यक्रमात गुहागर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय गुरव तथा डी. पी. गुरव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मंडळाचे हे ७५ वे वर्ष विविध समाजोपयोगी उपक्रमांनी पार पडले.
गुहागर तालुक्यातील नरवण येथील धरणवाडी सोमेश्वर मंडळाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून हे मंडळ नोंदणीकृत आहे. या मंडळाच्यावतीने गेली ७५ वर्ष सातत्याने विविधांगी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबविले जात आहेत. मंडळाच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सलग आठ दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले होते. या अनुषंगाने वाडीतील प्राथमिक शाळेत आपल्या नोकरीची सुरुवात करणाऱ्या दत्तात्रय परशुराम तथा डी.पी. गुरव या शिक्षकांनी या ठिकाणी बजावलेल्या सेवेसाठी विशेष गौरव करण्यात आला.
सत्तरीच्या दशकात प्रतिकूल परिस्थितीत दत्तात्रय गुरव यांनी या ग्रामीण भागात शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा या उद्देशाने कार्यरत राहिले. त्यांच्या समाजोपयोगी कार्याचा सन्मान मानपत्र, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नरवण कुणबी मंडळाचे अध्यक्ष अनंत मालप, कार्याध्यक्ष बाळ गोताड, धरणवाडी सोमेश्वर मंडळाचे मुंबई अध्यक्ष शंकर कुळये, सचिव सुनील मोरे, स्थानिक अध्यक्ष दत्ताराम गोणबरे, उपाध्यक्ष चंद्रकांत बाचीम, खजिनदार स्थानिक विठ्ठल कुळ्ये, शांताराम कुळ्ये, चंद्रकांत गोणबरे, प्रकाश जोगळे, सुलोचना कुळ्ये, स्वाती कुळ्ये आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने सलग आठ दिवस मंडळाने लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले होते. याचाच भाग म्हणून मंडळाच्या गेल्या ७५ वर्षांच्या कार्याचा लेखाजोगा मांडणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. वार्षिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या सोहळ्याची सांगता झाली. मंडळाच्या उपक्रमांसाठी धरणवाडीतील मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सर्वतोपरी मेहनत घेतली.