महाराष्ट्रराजकीय

निवडणूक आयोगा विरोधात ठाणे शहर काँग्रेसचे निषेध आंदोलन

  • काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत आंदोलन 

ठाणे  :  नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या गैरकृत्यांविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी ठाण्यात शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

दि. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य मो. नसीम खान, यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निषेध आंदोलन करण्यात आले. 

यावेळी प्रदेश सरचिटणीस व ठाणे जिल्हा प्रभारी राजेश शर्मा, हिंदूराव गळवे, राहुल पिंगळे यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी, सर्व प्रभाग अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आणि सर्व काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभाग झाले होते.

नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते, अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मतदारयाद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदानादिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुस-या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यातमध्ये मोठी तफावत आहे. यातही 76 लाख मतदान वाढलेले दाखवले आहे. सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमे-यांची व्यवस्था होती. त्यामुळे मतदारयाद्यातील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले 76 लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही, असा काँग्रेसचा आक्षेप आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button