मध्य रेल्वेने आरपीएफच्या साथीने केली ८५८ लहान मुलांची सुटका

- मध्य रेल्वेने रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) साथीने एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधी मध्ये ८५८ लहान मुलांची सुटका केली
- मुंबई विभागाने एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सर्वाधिक म्हणजे २५२ बालकांची सुटका केली
मुंबई : रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत लहान मुलांना गैरप्रकारांपासून वाचवण्याची जबाबदारीही ते योग्य पध्दतीने पार पाडत आहे.
मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण बलाने (आरपीएफ) शासकीय लोहमार्ग पोलीसांच्या समन्वयात ८५८ मुलांची सुटका केली आहे. मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानक परिसर व प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलीस आणि इतर अग्रभागी रेल्वे कर्मचारी यांनी एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत ५९१ मुले आणि २६७ मुलींचा समावेश असलेल्या आणि ‘चाइल्डलाइन’ सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांचे त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आणली.
काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे अथवा उच्च चांगल्या जीवन पध्दती किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांच्या निदर्शनास येत असतात. हे प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात आणि त्यांच्या समस्या समजून घेतात व त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा भेटण्याचा सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतात.
मध्य रेल्वेवर एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत सुटका केलेल्या मुलांचे विभागनिहाय विभाजन खालीलप्रमाणे आहे:-
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक २५२ मुलांची सुटका केली असून त्यात १५७ मुले आणि ९५ मुलींचा समावेश आहे.
भुसावळ विभागाने २३८ मुलांची सुटका केली असून यामध्ये १४८ मुले आणि ९० मुलींचा समावेश आहे.
पुणे विभागाने २०६ मुलांची सुटका केली असून त्यात १९८ मुले आणि ८ मुलींचा समावेश आहे.
नागपूर विभागाने १११ मुलांची सुटका केली असून यामध्ये ५८ मुले आणि ५३ मुलींचा समावेश आहे.
सोलापूर विभागाने ३० मुले आणि २१ मुलींचा समावेश असलेल्या ५१ मुलांची सुटका केली.