माखजन हायस्कूलचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय : शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत
माखजन (सुरेश सप्रे) : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून देणे जिकिरीचे असते. परंतु माखजन इंग्लिश स्कूल चे ग्रामीण भागातील शैक्षणिक काम उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांनी काढले. त्या माखजन इंग्लिश स्कूल मध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धांच्या उदघाटना प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद साठे, उपशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी, प्रकाश रेडीज,शिक्षण विस्तार अधिकारी विनायक पाध्ये,जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष इम्तियाज शेख, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष व शिक्षक परिषदेचे कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार,मुख्याध्यापिका सौ रूही पाटणकर,इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत उपस्थित होते.
यावेळी सौ सावंत पुढे म्हणाल्या की शैक्षणिक धोरणा प्रमाणे विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न झाला पाहिजे,आणि माखजन इंग्लिश स्कूल मध्ये हेच सारे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी वाढीस लागण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असून वाखाणण्याजोगे असल्याचे नमूद केले.यावेळी शाळेत चाललेल्या विविध कार्यक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
मान्यवरांचे मशालीने स्वागत करण्यात येवून विद्यार्थ्यांनी क्रीडा गीत सादर केले.
या कार्यक्रमावेळी मान्यवरांच्या समोर मल्लखांब व योगा प्रकारातील प्रात्यक्षिक सादर केली.
आनंद साठे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,सूत्रसंचालन महादेव परब,तर आभार स्नेहसंमेलन प्रमुख महादेव शिंदे यांनी मानले.